चंद्रपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणतात, आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार, तर आमदार धानोरकर सांगतात, वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला आज दोन्ही नेते हजर आहेत. त्यामुळे कोण कुठे जाणार, हे दोघांनाही विचारून घ्या व एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका. उगाच संभ्रम निर्माण करू नका, अशी मागणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार धोटे, विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार वडेट्टीवार, वरोरा-भद्रावतीच्या आमदार धानोरकर उपस्थित होत्या. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून आमदार धानोरकर, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार व त्यांची द्वितीय कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आमदार धोटे स्वत:देखील इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून धानोरकर व वडेट्टीवार गटाकडून एकमेकांबाबत भाजप प्रवेशावरून संभ्रम निर्माण केला जात आहे. पक्षाचेच वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एकमेकांबद्दल संभ्रम निर्माण करीत असेल तर संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. हा अपप्रचार पक्षाला हानीकारक ठरू शकतो. यामुळे आजच्या बैठकीला वडेट्टीवार व धानोरकर दोघेही उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्षांनी दोघांनाही एकदा स्पष्टपणे विचारावे की, कोण भाजपध्ये जाणार आहे. कुणीच कुठे जाणार नसेल तर अशाप्रकारे संभ्रम निर्माण करू नका. उगाच एकमेकांबद्दल अशा अफवा पसरवून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील वातावरण गढूळ करू नका. पक्षश्रेष्ठींकडे लोकसभेची उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांनाच आहे. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहून निवडून आणू, अशी ठाम भूमिका धोटे यांनी मांडली. ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी या वृत्ताला दुजोराही दिला.
हेही वाचा – यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध
शिवानी वडेट्टीवार यांना विरोध
लोकसभेची उमेदवारी मागणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार यांनी रविवारी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यांनी कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांची भेट घेतली. यानंतर ॲड. सातपुते यांनी तडकाफडकी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यामागचे नेमके कारण गुलदस्त्यात असले तरी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनीही ॲड. सातपुते यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीत वडेट्टीवार यांनी ॲड. सातपुते यांना काही आश्वासने दिली होती. ही आश्वासने पूर्ण करण्यापूर्वीच वडेट्टीवार व त्यांची कन्या शिवानी यांचे लोकसभेसाठी नाव समोर आले. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. शिवानी यांना लोकसभेची उमेदवारी देणे ही एकप्रकारे राजकीय आत्महत्या ठरेल, असा सूर काँग्रेस वर्तुळात उमटतो आहे.
हेही वाचा – नागपुरात हजारो कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’! साडेआठ हजार कोंबड्या मारण्याचे आदेश
वनमंत्री मुनगंटीवार-हंसराज अहीर दिल्लीत
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले असले तरी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्याचप्रमाणे अहीर वरिष्ठ पातळीवरून प्रयत्नशील आहेत. तिकडे बहुजन ओबीसी विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी अकोला येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात बहुजन ओबीसी उमेदवारच हवा, अशीही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुनगंटीवार व अहीर या दोघांनाही तातडीने दिल्लीत बोलावून घेतले आहे.