चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यासह बहुजन समाजाचा ओबीसी चेहरा डॉ.अशोक जीवतोडे यांच्या नावाची चर्चा भाजपाचे वर्तुळात आहे. भाजपाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून बहुजन ओबीसी उमेदवार दिला तर काँग्रेसचे पानिपत सहज शक्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीचे वारे जिल्ह्यात जोरात वाहायला सुरूवात झाली असली तरी काँग्रेस प्रमाणेच यंदा प्रथमच भाजपाची उमेदवारी कोणाला हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. दरवर्षी उमेदवार घोषित करण्यास कॉग्रेसला उशिर होतो. शेवटच्या क्षणी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होते. मात्र यावर्षी काँग्रेस प्रमाणेच भाजपाचा उमेदवार देखील अखेरच्या क्षणी जाहीर होईल असेच काहीचे चित्र सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसत आहे. २०१९ मध्ये भाजपाचे हंसराज अहीर यांचा काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी ४४ हजार मतांनी पराभव केला होता. हा पराभव जिव्हारी लागल्याने अहीर पराभवाच्या पहिल्या दिवसापासून पायाला भिंगरी लागल्यासारखे मतदार संघ पिंजून काढत आहे. आताही उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.

हेही वाचा…चंद्रपूर : शिंदे समर्थक आमदार जोरगेवारांचा स्वागत फलक अपघाताला निमंत्रण देणारा; स्वागत फलकात ट्रक फसल्याने वाहतुकीची कोंडी

अहीर म्हणतात भाजपाने यापूर्वी आपणाला जात पाहून उमेदवारी दिली नव्हती. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपा उमेदवार म्हणून जनतेने मला ४ वेळा विजयी केले. माझ्या मुळ जातीची फक्त १०० परिवार आहेत, मला पक्षाने वारंवार उमेदवारी दिली, मतदारांनी मला विजयी केले. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मी जिंकलो तेव्हा भाजपा जिंकली, लोकशाहीचा विजय झाला. पक्षाच्या तत्वांचा व संविधानाचा विजय झाला, निवडणूक पक्षाची व विचारांची असते. माझ्या पक्षाचे विचार जिंकले, माझा पक्ष जिंकला. चरित्र सांभाळून राजकारण केले असा दावा अहीर यांचा आहे. राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा लढण्याची इच्छा नाही, पक्ष श्रेष्ठींनी लढण्याचे आदेश दिले तर रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे.

विशेष म्हणजे आज घडीला निवडणुकीसाठी मुनगंटीवार सर्वच दृष्टीने तयार आहेत. मुनगंटीवार यांनी वणी, पांढरकवडा व केळापूर येथे दिल्लीवारीनंतर मोठे कार्यक्रम घेतले. भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक लावली. या भागात त्यांचा सतत संपर्क बघता मुनगंटीवार तयारीत असल्याचे दिसते. भाजपाकडून बहुजन ओबीसी चेहरा प्राचार्य डॉ.अशोक जीवतोडे यांनीही पक्ष श्रेष्ठींनी विश्वासाने उमेदवारी दिली तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळेच डॉ.जीवतोडे यांनी सर्वच आघाड्यांवर तयारी सुरू असून जनसंपर्क अभियान देखील सुरू केले आहे. जिवती, कोरपना पासून तर वणी, आर्णी या शेवटच्या टोकापर्यंत एससी,एसटी व मुस्लीम समाजाची गठ्ठा मते या मतदार संघात असली तरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी, बहुजनांची मते आहेत.

हेही वाचा…चंद्रपूर: वडेट्टीवारांनी लोकसभेसाठी मुलीचे नाव समोर केले! काँग्रेसच्या वर्तुळात…

भाजपाला २०१९ ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर भाजपा श्रेष्ठींना बहुजन उमेदवार द्यावा लागेल आणि मतदारांमध्येही हाच मतप्रवाह दिसून येत आहे. कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे डॉ.जीवतोडे चांदा शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंटमुळे लोकांच्या थेट संपर्कात आहेत. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक जाळे पसरले आहे. स्वतंत्र विदर्भ आंदोलनात सक्रीय आहे. माजी आमदार शिक्षण महर्षी श्रीहरी जीवतोडे गुरूजी यांचे ज्येष्ठ सुपूत्र असलेले डॉ.अशोक जीवतोडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून सक्रीय आहेत. धाकटे बंधू स्व.संजय जीवतोडे यांना जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्षपदी विराजमान करण्यात डॉ.अशोक जीवतोडे यांची भूमिका महत्वाची होती. श्रेष्ठींनी उमेदवारी कुणालाही दिली तरी भाजप उमेदवाराच्या प्रचारात सक्रीय राहू असा दावा डॉ.जीवतोडे यांनी केला आहे. एकीकडे डॉ.जीवतोडे यांचासारखा ओबीसी बहुजन उमेदवार तर दुसरीकडे मुनगंटीवार व अहीर या आघाडीवर भाजप उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur lok sabha seat competition for ticket in bjp between sudhir mungantiwar hansraj ahir and obc face dr ashok jeevtode rsj 74 psg