चंद्रपूर: मोबाइलवरून एका मुलाशी बोलल्याचे पाहून मोठ्या भावाने बहिणीच्या डोक्यावर काठीने प्रहार केल्याने गंभीर जखमी झालेल्या बहिणीचा उपचारा दरम्यान चंद्रपुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सुजाता कावरे (१९) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी रमेश कावरे (२३) याला अटक केली आहे.

जिवती तालुक्यातील शेणगाव येथे रमेश परवतम व रंजिता परवतम हे पती-पत्नी मुलांसह रवी तेलंग यांच्या घरी भाड्याने राहतात. त्या घरी सिरोंचा येथील मावसबहीण रजिता प्रसाद मुडमडगेला ही आली होती. त्यावेळी रजिता व रमेश परवतम, रजिताची बहीण सुजाता कावरे, रमेश कावरे व त्याचा मित्र चंदन हे घरी होते. मात्र, रमेश परवतमचे भोपाळ येथे काम असल्याने त्या दिवशी रात्री ९ वाजता रंजिता व रमेश परवतम हे मुलांसह भोपाळला निघून गेले.

हेही वाचा…नागपुरात काँग्रेसचा दुसरा गट पक्षाचे काम करणार का?

२७ मार्चला दुपारी २ वाजेदरम्यान आरोपी भाऊ रमेश कावरे याच्या फोनवर बहीण सुजाता मुलाशी बोलत असल्याच्या कारणावरून भावा-बहिणीत भांडण झाले. दरम्यान, रजिताने जाऊन बघितले असता रमेशने तिला खोलीत जायला सांगितले. त्यामुळे रजिता निघून गेल्यानंतर सुजाताच्या ओरडण्याचा मोठा आवाज आला. बहीण-भावाचे आपसी भांडण असल्याने रजिताने दुर्लक्ष केले. परंतु काही वेळाने खोलीत बघितल्यानंतर सुजाता ही रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. तिच्या अंगावर चादर टाकण्यात आली.

हेही वाचा…बुलढाण्यात तिरंगी लढतीची चिन्हे! युती-आघाडीसमोर नाराजीची आव्हाने; अपक्षांच्या ‘एन्ट्री’मुळे लढत रंजक

खोलीतच एक काठीही आढळली व भाऊ फरार झाला होता. अतिशय गंभीर अवस्थेत रजिताने नातेवाईकांच्या मदतीने भाजी विक्रीच्या हात ठेल्यावरून सुजाता हिला गडचांदुर येथील रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिथून चंद्रपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सुजाता हीचा मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मृत्यु झाला. दरम्यान या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जिवती पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

Story img Loader