चंद्रपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस नियोजित वेळेवर कार्यक्रमस्थळी पोहचू न शकल्याने माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावरून, हे दादासाहेबांचे अवमूल्यन असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

या सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री चंद्रपुरात आलेही, मात्र ऐनवेळी भाजप व माता महाकाली महोत्सव समितीने मुख्यमंत्र्यांचा स्वागत कार्यक्रम महाकाली मंदिरात आयोजित केला. आमदार किशोर जोरगेवार यांनी रोखून ठेवल्याने मुख्यमंत्री फडणवीस या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी नियोजित वेळेवर पोहचू शकले नाहीत. अखेर वडेट्टीवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आटोपताच १० मिनिटानंतर मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी कन्नमवार यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली खरी, मात्र उद्घाटनाला न आल्याने विविध चर्चांना पेव फुटले.

हेही वाचा : बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरगेवार यांनी संपूर्ण शहरात जी फलकबाजी केली, तीही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या फलकांवर कन्नमवार यांचे छायाचित्र नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे फलक आणि भाजपचे झेंडे पाहता हा कार्यक्रम जोरगेवार यांनीच ‘हायजॅक’ केल्याचे बोलले जात आहे. यामुळे श्रोत्यांनी सभागृहात येणे टाळले. राजकीय लाभापोटी करण्यात आलेल्या या संपूर्ण खटाटोपात लोकनेते कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याची उपेक्षाच झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

हेही वाचा : मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…

जोरगेवार यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार जोरगेवार यांच्या मागण्यांची आपल्या भाषणातून साधी दाखलही घेतली नाही. यावरून मुख्यमंत्र्यांनी जोरगेवारांकडे कानाडोळा केल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे. कार्यक्रमात सर्वत्र ढिसाळ नियोजन दिसून आले. मुख्यमंत्री प्रथम शहरात येत असतानाही लोकांची गर्दी दिसून आली नाही. दोनवेळा प्रास्ताविक झाले. स्वागतासाठी एकाचे नाव घेतले जात होते आणि दुसराच येत होता. एकंदरीत, कन्नमवार यांचे नाव समोर करून आमदार जोरगेवार यांनी राजकारण केल्याचा आरोप होत आहे.

Story img Loader