चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अक्षरश: फसवणूक केली आहे. राज ठाकरे यांनी चंद्रपुरात येऊन चंद्रपूर मतदार संघातून रोडे तर राजूरा येथून सचिन भोयर या दोघांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र रोडे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही.
राज ठाकरे दोन महिन्यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी हॉटेल एन.डी. येथे मनसैनिकांना ठाकरे यांनी मार्गदर्शन करतांना अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघातून जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे व राजूरा येथून माजी नगरसेवक सचिन भोयर यांची उमेदवारी जाहीर केली होती. या दोघांची नावे जाहीर केल्यानंतर ठाकरे हॉटेल मधून निघून गेल्यानंतर मनसैनिकांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. दरम्यान, हॉटेल मधून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी रोडे याच्या तुकूम येथील निवासस्थानी भेट देवून बराच वेळ तिथे घालविला व तिथून ते वणीसाठी रवाना झाले. स्वत: ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने मनसैनिक उत्साहात होते. स्वत: रोडे हे देखील प्रचारात लागले. वृत्तपत्र तसेच इतर माध्यमातून पत्रक वितरीत करून ते कसे योग्य उमेदवार आहे हे सांगत होते. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या.
हेही वाचा…बारावी नापासांना संधी आणि उच्चशिक्षितांना डावलले… काँग्रेसमधील ‘पोस्टरवार’मुळे…
२२ ते २९ ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करायचा होता. मात्र रोडे यांनी या काळात मनसेकडून किंवा अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. सर्व सहाही मतदार संघातील वैध व अवैध अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे जाहीर केली गेली. यामध्ये चंद्रपूर मतदार संघात मनसे जिल्हाध्यक्ष रोडे यांचे नावच नव्हते. त्यामुळे मनसैनिकांना एकच धक्का बसला. यासंदर्भात वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी रोडे यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. मेसेज पाठवून विचारणा केली असता त्यालाही प्रतिसाद दिला नाही. राजूराचे उमेदवार सचिन भोयर यांच्याशी संपर्क साधला असता रोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची फसवणूक केली, अशी माहिती दिली. दुसरे जिल्हा प्रमुख राहुल बालमवार यांना विचारणा केली असता, त्यांनीही रोडे यांनी अर्ज दाखल केला नाही असे सांगितले. दोन महिन्यापूर्वी स्वत: राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतरही रोडे यांनी ठाकरे व मनसैनिकांशी गद्दारी केली अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रोडे यांना निवडणुक लढायचीच नव्हती तर त्यांनी पूर्वीच तसे सांगायला हवे होते, असेही मनसैनिक बोलत आहेत.