चंद्रपूर: शहरात अमृत पाणी पुरवठा अभियान राबविण्यात आले. त्यावर सुमारे ४०० कोटीहून अधिक रुपये खर्च झाले. आता अमृत २.० अभियानांतर्गत चंद्रपूर महापालिकेला २७०.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात नुकताच शासन निर्णय जारी केला असून, यापूर्वीच्या अमृत योजनेतील प्रलंबित कामे या निधीतून पूर्ण करण्यात येणार आहेत. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीनंतर या अभियानाचा निधी येईल, यावर नजर ठेवून असलेल्या अनेक भावी नगरसेवकांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानाची राज्यात २०२१-२२ पासून अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांतर्गत राज्य जलकृती आराखड्यावर १८२३६.३९ कोटी रुपयांच्या आराखड्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यापूर्वीच्या अभियानात समाविष्ट असलेल्या राज्यातील ४४ शहरांत यात चंद्रपूर शहर महापालिकेचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये मलनिस्सारण सुविधा करण्यात येणार असून, पाणीपुरवठा, सरोवरांचे पुवरुज्जीवन, हरितक्षेत्र विकास या पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत. या मंजूर निधीत केंद्र शासन ३३, राज्य शासन ३६ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना ३० टक्के निधी राहणार आहे. ही सर्व कामे दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा… रावण दहन परंपरेचा विरोध! रावणाच्या मंदिरासाठी मिटकरींनी दिला २० लाखांचा निधी
चंद्रपूर महापालिकेत सध्या प्रशासक आहे. याच काळात हा निधी मंजूर झाला आहे. निवडणुका लांबणीवर गेल्याने कामेही प्रशासकांच्या काळात सुरू होणार आहेत. त्यामुळे या अभियानाच्या निधीवर डोळा ठेवून असलेल्या काही भावी नगरसेवकांच्या नशिबी निराशा आली आहे.