चंद्रपूर : रस्ते अपघातात २०२४ या मावळत्या वर्षात जिल्ह्यात जवळपास दोनशे जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच या अपघातांच्या घटनांमधून अल्पवयीन शाळकरी मुले विनापरवाना दुचाकी चालवीत असल्याचे समोर आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन चंद्रपूर शहरातील सर्व शाळांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना स्थानिक वाहतूक शाखेने एक पत्र पाठविले आहे. या पत्राच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांना सावधगिरीचा ईशारा पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन मुलाला दुचाकी दिल्यास तीन महिने कैद व २५ हजाराचा दंड पालकांना ठोठावण्यात येणार असे पत्रात नमूद आहे.
चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन शाळकरी मुले दुचाकी चालवित असल्याचे लक्षात आल्याने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनाच पत्र लिहून पालकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन केले अन्यथा पालकांना तीन महिने कैद व २५ हजार रुपयाचा दंडाचा सामना करावा लागू शकतो असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शाळेतील प्राचार्यांना पोलिसांचे पत्र मिळताच शाळांमधून आता प्रत्येक मुलांच्या पालकांना संदेश पाठवून आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यासाठी देऊ नका, असे कळकळीचे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा – नभोमंडपात ७ जानेवारीला सात घटनांचा अनोखा संगम
चंद्रपूर शहर व जिल्ह्यात अलिकडे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासणीत चंद्रपुरातील रस्त्यांवर अनेक शाळकरी अल्पवयीन मुले दुचाकी चालवित असल्याचे उघड झाले आहे. सातव्या वर्गापासून ते दहाव्या वर्गापर्यंतची मुलेही रस्त्यावर भरधाव दुचाकी चालवित असतात. अनेक जण शिकवणी वर्गाला जाण्यासाठी थेट् दुचाकीचाच वापर करीत आहेत आणि पालक देखील कुठल्याही गोष्टीची काळजी न करता अल्पवयीन पाल्याच्या हाती दुचाकी सोपवून मोकळे होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.
पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेमधून पालकांना मोबाईलवर संदेश येऊ लागले आहेत. आपल्या अल्पवयीन पाल्यांना दुचाकी देऊ नका अन्यथा तीन महिने शिक्षा व २५ हजार रूपये दंड होण्याची कायद्यात तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पवयीन शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी वाहतूक शाखेने उघडलेल्या या मोहीमेचे आता कौतूक केले जात आहे.
हेही वाचा – विकासाच्या नावाखाली अतिक्रमण, नागपुरातील काही उद्याने बंद, जागेवर व्यावसायिकांचा डोळा ?
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोणताही अपघात हा त्या व्यक्तीवर व त्याच्या कुटुंबावर होणारा फार मोठा आघात असून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून वाहन चालविणे आवश्यक आहे. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होवून रस्ते अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. हे अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणाना दिले. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे निर्देश दिले आहे.