चंद्रपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत असताना करोना संक्रमण काळात आकस्मिक अभिवचन रजेवर असताना विहीत कालावधीत कारागृहात परत न येता फरार झालेल्या विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी व दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर या दोन बंद्यांना चार वर्षानंतर अटक करण्यात चंद्रपूर पोलीसांना यश आले आहे. या दोन्ही बंद्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. २०२० पासून रजेवरुन फरार होते.चार वर्षापूर्वी २०२० मध्ये देशात सर्वत्र करोना सक्रमण होते. करोना कालावधीत कारागृहातील कैद्यांना कराेनाची बाधा होवू नये यासाठी सर्वांना रजेवर पाठविण्यात आले होते.
चंद्रपूर येथे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्हयात नागपूर मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत असतांना बंदी विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी रा. इंदिरानगर चंद्रपूर हा ८ मे, २०२० रोजी ४५ दिवसाच्या करोना आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र विक्की तिवारी विहीत वेळेवर कालावधीत कारागृहात परत न येता अनाधिकृतपणे फरार असल्याने त्याचेविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलीस त्याचा शोध घेत होती. मात्र पोलीसांना वारंवार चकमा देत विक्की फरार होत होता. तसेच राजुरा पोलीस ठाण्या अंतर्गत गुन्हयात शिक्षा भोगत असलेला बंदी दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर हा सुध्दा रजेवरुन अनाधिकृतपणे फरार होता.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हयात २२ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत चंद्रपूर जिल्हयात फरार बंदी शोथ मोहिम राबवण्यिात आली असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे शोध पथकाने सदर फरार बंदी नामे विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी आणि बंदी नामे दिपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर यांचा कसोशीने शोथ लावुन त्यांना ताब्यात घेवुन संबंधीत पो. ठाणे चे स्वाधिन केले. या दोघांची वैद्यकीय तपासणी करुन दोन्ही बंदी यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागह नागपुर येथे दाखल करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि दिपक कांकेडवार, स्वामीदास चालेकर, प्रकाश बलकी, अजय बागेसर, किशोर वैरागडे, नरोटे व चापोहवा अराडे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फरार बंद्यांचा चार वर्षापासून शोध सुरू होता.