लोकसत्ता टीम
चंद्रपूर : गेल्या आठवड्यात बियर बार मध्ये झालेल्या वादातून पोलिस शिपाई दिलीप चव्हाण याची तीन युवकांनी हत्या केली. हत्येच्या या घटनेनंतर पोलिस विभाग ऍक्शन मोडवर आला आहे. मंगळवारी भांडण झालेले पठाणपुरा मार्गावरील पिंक पेरेडाइज बियर बार सिल ठोकण्यात आले. तर आज पंधरा दुकानांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई चव्हाण याचे हत्येनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या बारमध्ये वाद सुरू झाला तो बार मंगळवारी सायंकाळी सील करण्यात आला. एवढेच नव्हे तर नियमांचे उल्लंघन करून शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली हॉटेल, ढाबा, बार आणि रेस्टॉरंट, आइस्क्रीम पार्लर, पानठेला, चायटपरी अशा १५ आस्थापनांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फ्रेंड्स बार, सिटी बार, करण बार, दीपक बार येथे कारवाई करण्यात आली. तर रामनगर भागातील राहुल ढाबा, १९७० राहुल ढाबा, टू-किचन हॉटेल, होस्ट बिर्याणी, वरोरा नाका येथील आइस्क्रीम पार्लर, जटपुरा गेट येथील ईटनकर पानठेला, सपना टॉकीज चौकातील पानठेला, हॉटेल, चायपरी, धांडे हॉस्पिटलजवळील पानठेला आदींवर कारवाई करण्यात आली.
चंद्रपूर शहरातील अनेक आस्थापने रात्री उशिरापर्यंत उघडी राहतात हे विशेष. अनेकवेळा पोलीस स्वत: रात्री उशिरा जेवण व चहा घेतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले पाहता पोलीस विभाग हादरला आहे. अशा परिस्थितीत होळी व इतर सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेवणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येकाने आपापली आस्थापने नियोजित वेळेत उघडून त्याच वेळी बंद करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.