चंद्रपूर: बहुप्रतिक्षित बाबुपेठ उड्डाणपूल गुरुवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या पुलाच्या श्रेयावरून आमदार किशोर जोरगेवार व भाजपात श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. या राजकारणातूनच भाजपाचे ब्रिजभूषण पाझाले यांनी मध्यरात्री अंधारात एक वाजता फटाके फोडून पूल रहदारीसाठी सुरू केला तर आमदार जोरगेवार यांनी शेकडो लोकांच्या उपस्थितीत पूल लोकांना रहदारीसाठी मोकळा केला.

आमदार किशोर जोरगेवार आणि वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार समर्थकातील संघर्ष मागील काही दिवसांपासून सुरू आहे. विधानसभा निवडणुका जवळ येताच हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गुरुवारी चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उडाणपूल रहदारीसाठी मोकळा करण्यावरून हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पूलाच्या उद्घाटनाबाबत जोरगेवार व मुनगंटीवार समर्थकांनी बॅनरबाजी केली. दोन्हीही गटांनी उद्घाटन पार पाडले.

हेही वाचा – अमरावती : शिवशाही बसला आग; जीवितहानी नाही

मुनगंटीवार समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांनी काही समर्थकांसह मध्यरात्री एक वाजता हा पूल रहदारीसाठी खुला केला. आमदार जोरगेवार यांनी दिवसा हा पूल रहदारसाठी मोकळा केला. यावेळी बोलताना आमदार जोरगेवार यांनी बाबुपेठ वासियांना दिलेला शब्द पूर्ण केला याचा आनंद असल्याचे सांगितले. मध्यरात्री लोकांचे जीव घेण्याचे, लोकांना त्रास देणारे खेळ चालतात, त्याप्रमाणे काहींनी सात आठ लोकांना सोबत घेत रात्री असा प्रकार केला असेही जोरगेवार म्हणाले.

हेही वाचा – संघ शिक्षा वर्गाला स्वयंसेवक घडवणारी शाळा का म्हटले जाते?

विशेष म्हणजे भाजप व जोरगेवार यांच्यात यापूर्वी आझाद बागेच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमातही असाच संघर्ष पाहायला मिळाला होता. भाजप कार्यकर्ते आणि जोरगेवार यांच्या ‘यंग चांदा ब्रिगेड’मध्ये संघर्षाच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून आमदार जोरगेवार महायुती सरकारला पाठिंबा देत आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार म्हणून लढतील, अशीही अपेक्षा होती. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी वितुष्ट असल्याने त्याचे राजकीय समीकरण बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यासंदर्भात भाजपाचे ब्रिजभूषण पाझारे यांना विचारले असता, दोनशे लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजताच हा पूल रहदारीसाठी सुरू केल्याचे सांगितले.