चंद्रपूर: आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपूरमध्ये हिवाळ्यात प्रदुषणात पुन्हा वाढ झाली आहे. ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये येथे प्रदुषणात वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून लक्षात येते. विशेष म्हणजे, सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे.
नोव्हेंबरच्या एकूण ३० दिवसांपैकी ३० ही दिवस प्रदूषित होते. ०-५० चांगला आणि ५१-१०९ समाधानकारक, असा निर्देशांक असलेला एकही दिवस नव्हता. १००-२०० निर्देशांक असलेले १९ दिवस प्रदूषित होते. २०१-३०० अतिशय वाईट निर्देशांक असलेले ११ दिवस अतिशय जास्त प्रदूषण आढळले. समाधानाची बाब म्हणजे, विदर्भात अनेक ठिकाणी आढळलेले अतिशय धोकादायक प्रदूषण येथे आढळले नाही, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
हेही वाचा… नितीन गडकरी म्हणतात, तृतीयपंथीयांनी…
प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सायकलचा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, औद्योगिक प्रदूषण रोखणे, नागरिकांनी प्रदूषण होऊ नये अशा उपाययोजना करणे आणि प्रशासनाकडून कठोर उपाययोजना राबवण्यात आल्या तरच प्रदुषणावर नियंत्रण येईल, असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.
कारणे काय?
वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यांवरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि स्थानिक उद्योग, इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकामे, रस्ते बांधणी सुरू असते. त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते. बहुतेक शहरातही अशाच समस्या निर्माण होत असल्याने प्रदुषणात वाढ होत आहे.
रोगराईत वाढ
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. थंडीमुळे आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी उत्तम मानला जात असे. परंतु अलीकडे प्रदुषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हे प्रदूषण आधीच श्वसनाचे आजार असणाऱ्यांना हानिकारक असते, तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, टीबी, हृदयरोग आणि मानसिक रोगही बळावतात.