चंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या सांचातून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे. या प्रदूषणाचा स्थानिक ग्रामस्थांना त्रास होत आहे. प्रदूषण शून्यावर आणणे प्रथम कर्तव्य आहे. अन्यथा वीज केंद्रातील दोन संच बंद करावे लागतील, असा स्पष्ट इशारा माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र असून येथील वीज देशभर वितरित केली जाते सोबतच चंद्रपूर जिल्ह्याच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. हा कोळसा देशभरात पुरवला जातो. मात्र, या प्रक्रियेतून होणाऱ्या प्रदूषणामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या प्रदूषणावर तात्काळ नियंत्रण आणा, अशा सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
हेही वाचा – VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
हेही वाचा – सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर वीज केंद्रातील अधिकारी व डब्लू.सी. एल. च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. वीज केंद्र व डब्लू. सी.एल. मुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे या प्रदूषणावर तात्काळ आळा घालावा, तातडीने उपाय योजना कराव्या असे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले आहे. यासोबतच येत्या १७ जानेवारी चंद्रपूर वीज केंद्र या भागाच्या दौरा करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. वीज केंद्राच्या पाहणी दौऱ्यात वीज केंद्राचे मुख्य अभियंता, वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी तथा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील सोबत राहणार आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले ही चिंतेची बाब आहे. प्रदूषण शून्यावर आणणे हा मुख्य उद्देश आहे असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. प्रदूषण संदर्भात वेळ पडली तर मुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील बैठक घेणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.