चंद्रपूर: राजुरा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी सहा बुथवरील व्हीव्हीपॅट व ईव्हीएमची नव्याने मोजणी करावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी अडीच लाख रूपये भरले असून येत्या ४५ दिवसांत व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार असल्याची माहिती आहे. या मतदार संघात भाजपाचे देवराव भोंगळे अवघ्या ३ हजार ५४ मतांनी विजयी झाले. येथेच निवडणुकीपूर्वी सहा हजारांपेक्षा अधिक बोगस मतदार नोंदणीचे प्रकरण देखील उघडकीस आले होते.
राजुरा मतदार संघ हा निवडणुकीच्या पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार सुभाष धोटे यांनी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मतमोजणीची मागणी केली आहे. निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत ही मागणी करणे बंधनकारक आहे. तेव्हा जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार धोटे यांनी २९ नोव्हेंबर पूर्वीच पैसे भरून ही मागणी केली आहे. एकूण सहा बुथवरील व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी धोटे यांनी केली आहे. एका बुथसाठी ४७ हजार याप्रमाणे धोटे यांना शंका असलेल्या सहा बुथची नावे त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज करून दिली आहे. तसेच सहा बुथचे अडीच लाख रुपये देखील निवडणूक अधिकारी कार्यालयात भरले असल्याची माहिती धोटे यांनी दिली. पैसे भरल्यानंतर ४५ दिवसात मतमोजणी केली जाणार आहे असेही धोेटे यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा : तेलंगणाच्या महाकाय प्रकल्पामुळे धोका वाढला! गडचिरोलीला चार वर्षांत चार भूकंपाचे धक्के…
दरम्यान, राजुरा मतदार संघात भाजपाचे देवराव भोंगळे अवघ्या ३ हजार ५४ मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे मतमोजणी सुरू झाल्यानंतर जवळपास पंधराव्या फेरीपर्यंत भोंगळे तिसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेसचे धोटे व शेतकरी संघटनेचे ॲड.वामनराव चटप यांच्यात काट्याची लढत होती. मात्र त्यानंतर अचानक भोंगळे आघाडीवर गेले. भोंगळे यांना गोंडपिंपरी व जिवती या दोन तालुक्यात मताधिक्क्य अधिक आहे. धोटे यांना जिथे मताधिक्क्याची अपेक्षा होती तिथेच कमी मतदान दिसत असल्याने त्यांनी त्याच बुथची नावे व्हीव्हीपॅट मोजणीसाठी दिली आहेत. विशेष म्हणजे राजुरा मतदार संघात निवडणुकीच्या पूर्वी बोगस मतदार नोंदणीचे प्रकरण देखील समोर आले होते. व्होटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून ६ हजार ८६१ बोगस मतदारांची नोंदणी झाली होती. सदर धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र बोगस मतदार नोंदणी करणारी ही व्यक्ती कोण याचा सुगावा लागलेला नाही.