चंद्रपूर : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. सोमवारी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर रविवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान देशात सर्वाधिक नोंदवले गेले. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४४.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हे सर्वोच्च तापमान ठरले आहे. तीव्र उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य होते.
एप्रिल महिन्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उष्णतेने त्रस्त झाले आहेत. रविवारी बुलढाणा वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांच्या तापमानाने चाळिशी ओलांडली. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर आणि वर्धाचे तापमान ४४ अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले.
चंद्रपुरात सकाळपासूनच तीव्र उन्हामुळे उकाडा जाणवत होता. दिवसभर वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले. बाजारपेठेचा दिवस असूनही दुपारच्या सुमारास प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता. सुट्टीचा दिवस आणि कडक उन्हामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर न पडणेच सुरक्षित मानले. यामुळे रस्त्यांवर मोजकीच वाहने दिसत होती.
विदर्भातील जिल्ह्यांचे तापमान
- अकोला ४४.३
- अमरावती ४४.४
- बुलढाणा ३९.६
- ब्रह्मपुरी ४४.४
- चंद्रपूर ४४.६
- गडचिरोली ४२.६
- गोंदिया ४२.२
- नागपूर ४४.०
- वर्धा ४४.०
- वाशीम ४२.६
- यवतमाळ ४३.६
२२, २३ ला उष्णतेची लाट!
नागपूर प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ आणि २३ एप्रिलला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वादळी पावसाची शक्यता
संपूर्ण राज्यातच उन्हाची काहिली आणखी वाढणार आहे. तर काही जिल्ह्यांत हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.