चंद्रपूर: सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक रविवारला पार पडली. आज सोमवारी मतमोजणी झाली असून यात आमदार विजय वडेट्टीवार यांच्या शेतकरी परिवर्तन आघाडीने १४ जागेवर विजय संपादन केला. शेतकरी सहकार आघाडीचे अपक्ष दोन उमेदवार निवडून आले मात्र भाजपच्या शेतकरी जनता परिवर्तन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची १७ जागेसाठी रविवारी मतदान झाले. सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटात तिसरी आघाडी असल्यामुळे निवडणूक रंगतदार झाल्याचे निकालावरून दिसून आले. सेवा सहकारी संस्था क्षेत्रातील सर्वसाधारण गटातून शेतकरी परिवर्तन आघाडीचे अनिल स्वामी, नितीन गोहने, एन टी ननावरे, राकेश गडमवार, हिवराज शेरकी, राजू ठाकरे, नरेश सुरमवार विजयी झाले. इतर मागास प्रवर्ग गटातून निखिल नरेश सुरमवार, विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातून प्रमोद दाजगाये, महिला आरक्षण गटातून कांताबाई बोरकुटे, नंदाताई आभारे निवडून आले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरडकर, सुनिल बोमनवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून अरविंद भैसारे विजयी झाले. व्यापारी गटातून सचिन तंगडपल्लीवार, प्रशांत चिटनूरवार तर मापारी हमाल गटातून मारोती सहारे विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे आमदार विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदिप गडमवार, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार, नगराध्यक्ष लताताई लाकडे, शहराध्यक्ष विजय मुत्यालवार यांनी अभिनंदन केले.

फेरमतमोजणीत नरेश सुरमवार विजयी

काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन आघाडी व अपक्ष शेतकरी सहकार आघाडी यांच्यातच चूरशीची लढत झाली. शेतकरी परिवर्तन आघाडीचे मधुकर शेंडे यांना १७० तर अपक्ष शेतकरी सहकार आघाडीचे नरेश सुरमवार यांना १६९ मते मिळाली. मात्र नरेश सुरमवार यांनी आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीत नरेश सुरमवार हे २ मतांनी विजय झाले.

आम्ही काँग्रेस पक्षासोबत

आम्हाला काँग्रेस प्रणित आघाडीत स्थान न मिळाल्याने तिसरी आघाडी बनवून अपक्ष लढा दिला व जिंकलाही परंतु आमचे नेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार असून आम्हा काँगेस सोबतच आहोत.

राकेश गडमवार, नरेश सुरमवार, अपक्ष विजयी उमेदवार