चंद्रपूर :आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा आवाज विधानसभेत बुलंद केल्याबद्दल लोकतंत्र सेनानी संघाने राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

लोकतंत्र सेनानी यांना राजस्थान सरकारने सन्मान म्हणून पेन्शन राशी २० हजार रुपये केली आहे. तसेच आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून ४ हजार रुपयांची राशी दर महिन्याला देत आहे. महाराष्ट्र सरकारने देखील हा निर्णय घ्यावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

लोकतंत्र सेनानींना मानधन मिळण्यात व इतर प्रशासकीय बाबींमध्ये येत असलेल्या अडचणींचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने आ. मुनगंटीवार यांची अलीकडेच प्रत्यक्ष भेट घेतली. लोकतंत्र सेनानी संघाचे (जालना, परतूर) कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित, महासचिव विश्वास कुलकर्णी (जळगाव), प्रदीप ओगले (सांगली), अरुण भिसे (यवतमाळ), पांडुरंग जिंजुर्डे (यवतमाळ) आणि यादवराव गहूकार (यवतमाळ) यांनी आ. मुनगंटीवार यांची भेट घेतली.

लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधित भरीव वाढ करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी निवेदनामध्ये राजस्थान सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला आहे. आणीबाणीमुळे देशाच्या लोकशाहीचे महत्त्व लक्षात घेऊन लोकतंत्र सेनानी म्हणून ज्यांनी करावास भोगला, त्या सर्व लोकतंत्र सेनानींचा सन्मान करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

राजस्थान सरकारने लोकतंत्र सेनानी सन्मान म्हणून पेन्शन राशी २० हजार रुपये केली आहे. तसेच आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून ४ हजार रुपयांची राशी दर महिन्याला तेथे दिली जाते. महाराष्ट्रात सध्यस्थितीत ४ हजार १०३ स्वातंत्र्य सेनानी सन्मान निधीस पात्र आहेत. राजस्थान सरकारची अधिसूचना लक्षात घेऊन महाराष्ट्रात देखील हा सन्मान निधी वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

विधानसभेतील चर्चेत विविध मतदारसंघांच्या आमदारांनी सहभागी होणे तसेच हा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देणे, हे केवळ आ. मुनगंटीवार यांच्यामुळे शक्य झाले आहे. तसेच आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनावर देखील कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आणीबाणीमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पितपणे लढणाऱ्या सेनानींसाठी आ.मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, या शब्दांत लोकतंत्र सेनानी संघाने आभार व्यक्त केले आहेत.

ताम्रपत्रासाठी प्रयत्न करण्याचा शब्द

सर्व सेनानींना सरकारतर्फे ताम्रपत्र देण्याची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली. यावर सरकारदरबारी नक्की प्रयत्न करणार, असा शब्द आ. मुनगंटीवार यांनी दिला. यासोबतच सेनानींच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांना मिळणारे मानधन बंद झाल्याचा मुद्दाही आ.मुनगंटीवार यांनी नोंदवून घेतला. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.