चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना नाममात्र दरात जिप्सीसारख्या वाहनात बसून व्याघ्र पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. प्रशासनाने सहा ‘क्रूझर’ वाहने खरेदी करून त्यात ‘जिप्सी’प्रमाणे बदल करून घेतले आहेत. या वाहनात १० पर्यटकांना एकत्र बसता येणार आहे. १ ऑक्टोबरपासून ही विशेष वाहने पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. या विशेष वाहनाच्या प्रती पर्यटनाचे दर अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, ते कमी असल्याचे सांगितले जात आहे. पावसाळ्यामुळे कोअर परिसर सध्या पर्यटनासाठी बंद आहे. १ ऑक्टोबरपासून कोअर क्षेत्र पर्यटनासाठी खुले होत असून या दिवसापासूनच ही विशेष वाहने पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे.
नियमित पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष वाहनाने पर्यटन घडवले जाणार आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात चार ‘कॅन्टर’ सुरू आहेत. या चारही ‘कॅन्टर’ची सेवा आता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. ताडोबात दररोज किमान शंभर शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र पर्यटन घडवण्याचा मनोदय आहे. त्यानुसार या ‘कॅन्टर’चा उपयोग केला जाणार आहे, अशी माहिती ताडोबाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
हेही वाचा : नागपुरात दोन डेंग्यू संशयितांचा मृत्यू! रुग्णसंख्या ३०० पेक्षा जास्त
वाघाला पळवण्यासाठी मुखवट्याचा प्रयोग
भद्रावती तालुक्यातील टेकाडी येथे धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पळवण्यासाठी व जेरबंद करण्यासाठी पुन्हा मुखवट्याचा प्रयोग केला जात आहे. येथे २० ‘कॅमेरा ट्रॅप’ लावण्यात आले आहेत. दरम्यान, लक्ष्मीबाई रामराव कन्नाके या महिलेचा २५ ऑगस्ट २०२३ रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वनविभागाने तत्काळ कार्यवाही पूर्ण करीत अवघ्या दोन दिवसात मृत महिलेचे पती रामराव कन्नाके व त्यांच्या वारसांच्या बँक खात्यात २५ लाख रुपयांची मदत जमा केली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून गावामध्ये जनजागृती करण्यात येत असून फलक लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मुखवटे वाटप करण्यात आलेले आहे.