चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात चार वर्षांपूर्वी मृत पावलेल्या एका वाघाची चार नखे तेलंगणातील एका व्यापाऱ्याला पाच लाख रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी वन विभागाने आठ आरोपींना अटक केली आहे. वाघांच्या अवयवांची विक्री करणारी मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, एका आरोपीच्या घराची वन विभागाने झडती घेतली असता नीलगाय व चितळाची शिंगे, वाघाचे दात व हाडे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर – मुल मार्गावरील चंद्रपूर शहरापासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या लोहारा येथील वाघाच्या पंजाच्या अवैध व्यापार प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी संदीप तोडसे आणि शेखराव यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी आणखी ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ आरोपींना वन कोठडी सुनावण्यात आली. ४ जणांची न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) रवानगी करण्यात आली असून १ आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यातील एक आरोपी हा मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणात एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा – शेतकऱ्यांना विहिरी मोफत ! ‘या’ नामांकित उद्योगाचा पुढाकार
सूत्रांचे म्हणणे आहे की अटक करण्यात आलेले आरोपी केवळ स्थानिक लोक आहेत, ज्यांचा वापर करण्यात आला आहे. आरोपींकडून ज्या वाघाचे नखे जप्त करण्यात आले आहे, तो वाघ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या बफर भागातील चक निंबाळा येथून आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याठिकाणी वाघाची शिकार झाली की वाघीण मृतावस्थेत आढळून आली याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पेंढरी येथील एका आरोपी मोरेश्वर कुमरे याच्या घराची झडती घेतली असता निलगाय, चितळची शिंगे, वाघाचे दातांचे तुकडे व हाडे जप्त करण्यात आली. संतोष कुळमेथे, दयाराम मेश्राम पेटगाव, सिंदेवाही, दिलीप बावणे, चिखली, मूल, चतुर मेश्राम, बेलगाटा, मूल, चांगदेव आलाम, चेक बोर्डा यांचा समावेश आहे. चौकशी केल्यानंतर उमाकर कुमरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी वाघनखे विक्रीचा सौदा तेलंगणा येथील राजशेखर रेड्डी या व्यक्तीशी केला होता. यामध्ये वलनी येथील म्होरक्याने महत्त्वाची भूमिका वठविली होती, अशी धक्कादायक माहिती वलनी येथील सूत्रांकडून मिळाली.
हा म्होरक्या आणि खरेदीदार अद्यापही वन विभागाच्या जाळ्यात अडकलेला नाही. सूत्राच्या माहितीनुसार, राजशेखर रेड्डी हा दोन वर्षांपासून लोहारा जवळील वलनी येथे येत होता. वलनीतील एका घरी तो वास्तव्यासही असायचा. एका इसमाच्या घरी वास्तव्यास राहून तो रेकी करायचा. वन्यजीवांच्या तस्करीत त्याची महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली.
वन विभागाच्या ताब्यात असलेल्या उमाकर कुमरे याच्याकडून चांगदेव आलाम याने अवघ्या दोन हजार रुपयांत दोन वाघनखे खरेदी केली होती. ती त्याने संदीप तोडासे याला विक्रीकरिता दिली. संदीपचा वलनी येथील म्होरक्याच्या माध्यमातून तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील राजशेखर रेड्डी यांच्याशी संपर्क आला. उभयतांमध्ये एका वाघनखाचा सव्वालाखात, असा चार वाघनखांचा पाच लाख रुपयांत सौदा झाला होता. मात्र, याची चुणूक वन विभागाला लागल्याने लोहारा येथील दोघांना वाघनखांसह अटक करण्यात आल्याने हा सौदा फिस्कटला. तपासात अन्य वन्यजीवांचेही अवयव हस्तगत करण्यात आल्याने यामागे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे.
सध्या या प्रकरणातील मोरेश्वर कुमरे, पेंढारी व अन्य २ आरोपींचा शोध सुरू आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर करत आहेत. ही कारवाई चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) जितेंद्र रामगावकर, डीसीएफ श्वेता बोड्डू, डीएफओ प्रशांत खाडे, चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.