चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर २ लाख ६० हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), रिपाइं (खोब्रागडे) या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांना आता आमदारकीची स्वप्ने पडायला लागली आहेत. अनेकांनी ‘भावी आमदार’ अशी फलकबाजी करीत सहल, पार्ट्या, ‘अम्मा का टिफीन’, ‘अम्मा की पढाई’, रवा-साखर व छत्रीवाटप करीत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील चार व यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी असे दोन मिळून सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. धानोरकर यांना या सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली. तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या जिल्ह्यातील चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच आघाडी मिळाली. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे.
हेही वाचा – लोकसभेतील पराभवानंतरही महायुती सरकारची मनमानी! बहुजन विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीपासून…
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संदीप गिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वैद्य, काँग्रेसचे संतोष रावत, घनश्याम मुलचंदानी, नंदू नगरकर, देवराव भांडेकर, नंदू खनके, डॉ. अभिलाषा गावतुरे, प्रकाश पाटील मारकवार, डॉ. झाडे, राजू झोडे, चंद्रपूर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून महेश मेंढे, प्रवीण पडवेकर, राजेश अडुर, रिपाइं खोब्रागडे गटाचे बाळू खोब्रागडे तथा इतरही अनेक जण तयारीत आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या समोर कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर वरोरा विधानसभा मतदारसंघातून अनिल धानोरकर, शिवसेना ठाकरे गटाकडून रवींद्र शिंदे, विजय बदखल, डॉ. विजय देवतळे, डॉ. खापने, यांच्यासह अनेक जण तयारीला लागले आहेत. ब्रम्हपुरी व राजुरा विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे यांचे आहेत. तिथूनही अनेक जण निवडणूक लढण्यास तयार आहेत. चिमूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. अविनाश वारजुकर, डॉ. सतीश वारजूकर यांच्यासह अनेक जण तयारीला लागले आहेत. मतदारांना आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही, अशा थाटात काँग्रेसमधील इच्छुक वावरत आहेत.
प्रतिभा धानोरकर यांचा आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा
नवनिर्वाचित खासदार तथा वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर गुरुवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्या आपला राजीनामा सोपवतील. २०१९ मध्ये वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार म्हणून धानोरकर निवडून आल्या होत्या. सलग साडेचार वर्षे त्यांनी आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या.