चंद्रपूर : हैदराबाद येथील ग्रँड फॉर्च्युन इन्फ्रा डेव्हलपर्स या कपंनीने औद्योगिक नगरी, गडचांदूर व परिसरातील शेकडो गरीब ग्रामस्थांची मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून २ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक केली. कंपनीसह आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपी रेड्डीचा शोध घेतला जात आहे.

लगतच्या आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे मुख्य कार्यालय असलेल्या ग्रँड फॉर्च्युन इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपनीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोरगरीब गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. आरोपी रेड्डीने कंपनीमार्फत ग्रामीण भागातील लोकांना विविध योजनांद्वारे आमिष दाखवले. जास्त परताव्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडले. याबाबत रेवनाथ आनंद एकरे (४६) रा. वॉर्ड क्र. ३, पोलीस ठाण्याच्या मागे, गडचांदूर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान रेड्डीने २ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. गुन्हा दाखल होताच रेड्डी पसार झाला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी आजपावेतो परिशिष्ट क्र. १ अर्ज भरून दिला नाही, त्यांनी आठ दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे अर्ज जमा करावे. आरोपीचा सुगावा लागल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर तसेच तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांना कळवावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाने एक पथक गठीत केले आहे. या पथकाच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे.

दोनशेपेक्षा अधिक लोकांची फसवणूक

हैदराबाद येथील ग्रँड फॉर्च्युन इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीच्या माध्यमातून मुक्तीराज रेड्डीने दोन वर्षांपूर्वी गडचांदूर येथे येऊन स्थानिकांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवले. या दोनशेपेक्षा अधिक लोक बळी पडले. कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर अन्य दोनशे लोकांनीही कंपनीविरोधात तक्रारी दाखल केल्याचे रेवनाथ आनंद एकरे यांनी सांगितले.

Story img Loader