चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी बाबुपेठ परिसरात ८.५३ एकर जागा मिळाली. या उपकेंद्राच्या सुसज्ज इमारतीसाठी २०० कोटींची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. मात्र, शासनदरबारी हा प्रस्ताव धूळखात पडला असल्याने सध्यातरी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीसाठी वाट बघावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार २०११ मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ सुरू झाले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ महत्त्वाचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १३३ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्नित आहेत. येथील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना विद्यापीठातील कामानिमित्त गडचिरोलीला जावे लागते. हा त्रास दूर व्हावा, यासाठी मुनगंटीवार यांनी गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे व्हावे, अशी मागणी शासनस्तरावर लावून धरली.

मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार शासनाने एक समिती गठीत केली. जागेची पाहणी करण्यासाठी समिती सदस्य सुधींद्र कुळकर्णी येथे येवून गेले. त्यानंतर २०२२ मध्ये उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी बाबुपेठ परिसरात ८.५३ एकर जागा मंजूर केली. उपकेंद्रासाठी जागा मिळून दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.

उपकेंद्रासाठी २०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळावा म्हणून मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला. मात्र अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे उपकेंद्राच्या नवीन वास्तूचे काम सुरू होण्यास विलंब लागणार आहे. विद्यापीठाच्या नवीन उपकेंद्राची वास्तू अतिशय आधुनिक व सर्व सुविधांनी परिपूर्ण, अशी राहणार आहे. मात्र निधीच मिळत नसल्याने सध्यातरी हा विषय प्रलंबित आहे. निधीसाठी मुनगंटीवार शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. शासनाने निधी मंजूर केल्यानंतरच इमारतीचे काम सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

…तर विद्यार्थी, प्राध्यापकांची अडचण दूर होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील १३३ महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठात शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांना छोट्या-मोठ्या कामासाठी गडचिरोलीला जावे लागते. तसेच प्राचार्य, प्राध्यापकांनाही पेपर तपासण्यापासून सर्वच कामांसाठी विद्यापीठात जावे लागते. उपकेंद्र चंद्रपूर येथे झाले तर या सर्व अडचणी दूर होतील, असे विद्यार्थी आणि प्राध्यापक सांगतात.