नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वीच बीएनएचएसने टॅगिंग केलेल्या गिधाडांपैकी तीन गिधाडे मृतावस्थेत सापडली, तर आता पुन्हा एक टॅगिंग केलेले गिधाड नागपूरजवळ सापडले. त्याआधी यवतमाळ येथेही टॅगिंग केलेले एक गिधाड निपचित अवस्थेत सापडले होते. त्यामुळे गिधाडांच्या संख्या वाढीसाठी चाललेला हा प्रयत्न चर्चेत आला आहे. दरम्यान, नागपूरजवळ सापडलेल्या गिधाडावर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात उपचार सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरियाणा येथील पिंजोरमधील गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्रातून आणलेली लांब चोचीची (भारतीय गिधाड) गिधाडे जीपीएस टॅगिंग करून काही महिन्यांपूर्वी ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात आली. त्यातील एक गिधाड दोन ते तीन महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात निपचित अवस्थेत सापडले. या गिधाडाला वर्ध्यातील करुणाश्रमने जीवदान दिले. ते पेंच व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात आलेल्या गिधाडांपैकी एक होते. त्यानंतर आता तीन दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात याच टॅगिंग केलेल्या गिधाडांपैकी तीन मृतावस्थेत सापडली. तर आता नागपूरजवळ कन्हान कांद्री कोळसा खाणी संकुलात रात्री उशिरा आलेल्या बीएनएचएसने “टॅगिंग” केलेला दुर्मिळ गिधाड पक्ष्याला प्राणीमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी, २८ नोव्हेंबरला रात्री १० वाजता घडली. कोळसा खाणीचे कर्मचारी रात्री दहा वाजता कन्हान कांद्री कोळसा खाणीच्या उपकेंद्राच्या आवारात गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक मोठा पक्षी दिसला. हे पाहून कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही बाब वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य आशिष मेश्राम व बबलू मुलुंडे यांना कळवली. दोन्ही प्राणीमित्र आपल्या साथीदारांसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तो विशाल पक्षी गिधाड असल्याचे त्यांना कळले.

हेही वाचा : चंद्रपूर : अनेक भागात वीज केंद्रातील ‘फ्लाय ॲश’चे ढीग! प्रदूषणासह आरोग्याच्या समस्या

गिधाडाच्या अंगावर ट्रॅकर बसवण्यात आला होता, हे पाहून प्राणीमित्रांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राणीमित्रांना ताबडतोब पक्षी पकडण्याची सूचना केली. अन्यथा गिधाड पक्षी खाणींच्या परिसरात जाण्याची भीती आहे. त्यानंतर त्याला शोधणे कठीण होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे प्राणीमित्रांनी या पक्ष्याला यशस्वीरित्या पकडले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर सेमिनरी हिल्स येथील वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात गिधाड देण्यात आले.

हेही वाचा : भंडारा: आईवडील दगावले, दोन वर्षाचा चिमुकला बचावला…शिवशाही अपघातात जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू

या बचावकार्यात सोसायटीचे चंद्रशेखर बोरकर, रोहित फरकासे, गुड्डू नेहल, अंकेश, दीपक, गोपाल बिसेन, मनीष नंदेश्वर, प्रवेश डोंगरे आदींनी मदत केली. ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या चमूने गिधाड संवर्धनासाठी काम करणाऱ्या बीएनएचएसला ट्रॅकर आणि पक्ष्यांची माहिती पाठवून आवश्यक माहिती मागवली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur three vultures death vulture found with tagging on legs forest department rgc 76 css