चंद्रपूर : मूल तालुक्यातील जानाळा येथील गुराखी गुलाब वेळमे (५०) यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ते ठार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील दोन आठवड्यात तीन गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याने तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे.
मूल तालुक्यातील जानाळा येथून गुलाब वेळमे हा गुराखी जवळच असलेल्या डोनी फाट्याजवळ गायी, बकऱ्या, गुरे चरायला घेऊन गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. या घटनेची माहिती वन खात्याला मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
हेही वाचा…नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
मूल तालुक्यात वाघाचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
© The Indian Express (P) Ltd