चंद्रपूर : शेतपिकांना कुंपण करून त्यात सोडलेल्या विजप्रवाहामुळे वाघाचा मृत्यू झाला. ही बाब समोर येवू नये यासाठी तीन दिवस वाघाच्या अवयवांचे तुकडे करून जाळण्यात आले. त्यानंतर जाळलेले अवयव जमिनीत खड्डा करून पुरण्यात आल्याची धक्कादायक बाब मुल वनपरिक्षेत्रातील उथळपेठ येथे उघडकीस आली.
उथळपेठ येथील शेतकरी सुरेश चिचघरे यांनी डिसेंबर २०२३ मध्ये भाताशेतीला कुंपण करून त्यात विजप्रवाह सोडला. या विजप्रवाहाला स्पर्श होवून एका वाघाचा मृत्यू झाला. ही बाब शेतकरी सुरेश चिचघरे यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब कुणालाही कळू नये यासाठी वाघाच्या अवयवाचे सलग तीन दिवस तुकडे करून जाळले. त्यानंतर जाळलेले तुकडे नांगरटी करून एका खोल खड्ड्यात पुरण्यात आले. याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने जागेची पाहणी केली असता वाघाचे दात, सुळे, हाडे आढळून आले.
हेही वाचा – सावधान ! उपराजधानीत वाढला बिबट्याचा वावर
याप्रकरणी शेतकरी सुरेश चिचघरे व अवयव पुरण्यासाठी मदत करणाऱ्या श्रीकांत मुरलीधर बुरांडे यांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली आहे. सदरची कारवाई विभागीय वनाधिकारी शुभांगी चव्हाण, सहायक वनसंरक्षक जी.आर. नायगमकर, वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांच्या पथकाने केली आहे.
याप्रकरणी शेतकरी सुरेश चिचघरे व अवयव पुरण्यासाठी मदत करणाऱ्या श्रीकांत मुरलीधर बुरांडे यांना १५ दिवसाची वनकोठडी ठोठावण्यात आली आहे. वाहने व अवयव तोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रेम प्रकरणातून वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले आहे.
हेही वाचा – निवडणूक व्यवस्थापनात तज्ज्ञ नागपूरकर नेत्यांकडे काँग्रेसने दिली नवी जबाबदारी
प्रेम प्रकरणातून उलगडले वाघाच्या शिकारीचे प्रकरण
प्रेमविवाहाला नकारातून वाघाच्या शिकारीचे प्रकरण अतिशय नाट्यमयरित्या उघडकीस आले आहे. शिकार प्रकरणात अडकलेल्या आरोपीच्या मुलाचे गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि विवाहाचा निर्णय घेतला. मुलाच्या इच्छेनुसार पित्याने मुलीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घातली. मात्र, मुलीच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता. तसा नकारही मुलीच्या वडिलांनी कळविला. एवढ्यावरच मुलीचे वडील थांबले नाही तर मुलीला प्रेमाच्या पाशात अडकविणाऱ्या मुलाची व त्याच्या वडिलांची मुल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी पिता-पुत्राला अटक करून मुल पोलीस ठाण्यात आणले. या प्रकारामुळे वडील व मुलगा चांगलेच चिडले. लग्नाला नकार तर दिलाच पण पोलिसात तक्रार करून आपल्याला अटक करविल्याच्या रागात मुलाच्या वडिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना २०२३ मधील वाघाच्या शिकारीचे रहस्य सांगितले. तिथून या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले.