चंद्रपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वत्र निवडणुकीची धामधूम आहे. निवडणुकीतील उमेदवार विजयासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. एक-एक मत महत्त्वाचे म्हणून जीवतोड मेहनत करत आहेत. या धामधूमीत बल्लारपूर शहरात अनोखा संगम घडला. दोन परस्पर विचारधारा असणारे मातब्बर नेते एकत्र आले. विधानसभेत सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जाणारे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कामगार संघटनेच्या सभेत हजेरी लावली. ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांचेवर मनोगतातून स्तुतीसुमनाचा वर्षाव केला. हा अनोखा संगम बल्लारपूरकरांनी शनिवारी इंदिरा गांधी क्रीडा संकुल कलामंदिर येथील प्रांगणात अनुभवला. औचित्य होते बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेच्या ७१ व्या युनियन वर्धापन दिन कार्यक्रमाचे. हा सोहळा होता श्री गुरुनानक देव आणि क्रांतीसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक म्हटली की, आरोप-प्रत्यारोप एकमेकांवर करण्याचा प्रसंग. मात्र भिन्न विचारधारा असणारे दोन राजकीय मातब्बर नेते एकाच मंचावर येतात. एकमेकांप्रती आदरभाव व्यक्त करतात. हा राजकारणाचा डावपेचाचा भाग असेल. मात्र,विधानसभा निवडणूक मतदान अवघ्या चार दिवसावर आले असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची एकाच मंचावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला निमंत्रण देणारी भेट ठरली आहे.

हेही वाचा : संविधान बदल अन् ‘ चारसो पार’ चा नारा:मोदी, शाहांविरुद्ध एफआयआर करा,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

बल्लारपूर पेपर मिलमधील कामगारांनी प्रारंभी मोटार सायकल मिरवणूक काढून ‘ जो कामगार के हित की बात करेगा, हमारा व्होट उसके पक्ष में जायेगा’ म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी व बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मागील ४१ वर्षांपासून कामगार क्षेत्रात नरेश पुगलिया सेवा देत आहेत. कुटुंबातील सदस्यांसारखे सर्वांना सांभाळून घेत आहे. त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढत आहे. पेपर मिल उद्योगामुळे १० हजारावर कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. या उद्योगाला लागणारा कच्चा माल आपल्याच राज्यातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. खरे म्हणजे कामगार क्षेत्रात नरेश पुगलिया हे व्यक्तीमत्व कणखर नेतृत्वाचे आहे, असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कामगार नेते पुगलिया यांचेवर स्तुती वर्षाव केला. दरम्यान नरेश पुगलिया यांच्या हस्ते कामगार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंतराव मांढरे, कार्याध्यक्ष तारासिंग कलशी,चंद्रशेखर पोडे, कृष्णन अय्यर,रामदास वाग्दरकर यांचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर युवा नेते राहूल पुगलिया, ॲड.अविनाश ठावरी,अशोक नागापूरे,देवेंद्र बेले,साईनाथ बुचे,शिवचंद काळे, नासिर खान यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अनिल तुंगीडवार यांनी केले. आभार चंद्रशेखर पोडे यांनी मानले. यावेळी कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचा : अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…

कामगार विरोधी भूमिका घेणाऱ्यांना धडा शिकवणार – नरेश पुगलिया

माझी विचारसरणी कांग्रेसची आहे. मात्र,उद्योगातील कामगारांचे हित देखील महत्वाचे आहे. चंद्रपूर जिल्हा औद्योगिक आहे. बल्लारपूर पेपर मिल जिल्ह्यातील अर्थवाहीनी आहे. या उद्योगातील कामगारांना अन्य कागद उद्योगपेक्षा सर्वाधिक वेतनश्रेणी आहे. १९५२ पासून हा उद्योग सेवारत आहे. येथील कामगारांना उत्पादन बोनस ४० टक्के, तर सुपर बोनस ४५ टक्के आहे. कामगार संघटना व व्यवस्थापन सोबत समन्वयाने कामगारांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागतो. मात्र,कामगारांचे शोषण करणाऱ्यांना सोडणार नाही. केंद्र व राज्य सरकार सोबत योग्य वाटाघाटी करून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार विधानसभेत निवडा. कामगार विरोधात भूमिका घेणारे उमेदवार विधानसभेत पाडा,असा सूचक इशारा या निमित्त कांग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur vidhan sabha election 2024 congress leader naresh puglia bjp sudhir mungantiwar on same stage rsj 74 css