नागपूर : राज्यातील अनेक अभयारण्यांना जोडणाऱ्या महामार्गांवर उपशमन योजनाच नसल्यामुळे वन्यजीवांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ताडोबा लँडस्केपमधील सात रस्त्यांच्या विभागांमध्ये २६ अंडरपास बांधण्याचे आदेश रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला दिले होते. त्यापैकी आतापर्यंत एकच पूर्ण झाला. त्यामुळे या परिसरातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंद्रपूर-मूल महामार्गावर अलिकडेच सुमारे एक हजार किलो वजनाच्या रानगव्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ४२ किलोमीटरच्या जंगल पट्ट्यात प्रभावी वन्यजीव प्रतिबंधक उपाययोजनांच्या अभावाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हा महामार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागून आहे. या महामार्गावर वन्यप्राणी नेहमीच रस्ता ओलांडताना दिसतात. ४२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा एक महत्त्वाचा भाग ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये आहे.
कावल अभयारण्य, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, उमरेड कऱ्हांडला अभयारण्याला जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असून तो ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधून जातो. हा मार्ग मध्य चांदाच्या घनदाट जंगलांमधून देखील जातो आणि याठिकाणी मोठ्या संख्येने वन्यप्राणी आहेत.
वन्यजीव धोक्यात
२०२४ मध्ये चंद्रपूर-मूल महामार्गावर २१ वन्यप्राण्यांचा अपघातात मृत्यू झाला तर २०२५ मध्ये पहिल्या साडेतीन महिन्यातच सहा वन्यजीव ठार झाले. रस्ते अपघातात मृत पावलेल्या वन्यप्राण्यांच्या नोंदी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी व रोडबिल इंडिया (लँडस्केप रिसर्च अँड कन्झर्वेशन फाऊंडेशन) या संस्था करीत असतात.
झुडपे काढण्याकडे दुर्लक्ष : महामार्गालगतची झुडपे काढण्याकडे दुर्लक्ष महामार्गालगतची झुडपे काढावी, ज्यामुळे वन्यप्राण्यांना व नागरिकांना रस्त्यावर येणारा प्राणी निदर्शनास येईल, अशा सूचना असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. उपशमन योजनांवर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.