चंद्रपूर : अठराव्या लोकसभेसाठी येथे शांततेत मतदान पार पडल्यानंतर सर्वत्र ‘भाऊ’ आणि ‘ताई’ची चर्चा आहे. गल्ली-बोळात, चौका-चौकात, चाय टपरीवर, रस्त्यांवर, सकाळी मॉर्निंग वॉक व कट्ट्यावर ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. भाजप व काँग्रेस समर्थकांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा केला जात आहे. कोण विजयी होणार उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र त्यासाठी ४५ दिवस वाट बघावी लागणार आहे. ताई की भाऊ यावर पैजा घेतल्या जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १२ लाख २२ हजार ४७५ मतदारांनी मतदान केले होते. तर २०२४ च्या लोकसभेत १२ लाख ४१ हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये केवळ १९ हजार ४७७ इतकेच मतदान वाढले आहे. यावेळी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या सरळ लढत आहे. एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०६ मतदारापैकी १२ लक्ष ४१ हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जवळपास सहा लाख मतदारांनी मतदानाकडे पाठ फरवली आहे. लोकसभेच्या रिंगणात असलेल्या १५ उमेवारांचे भाग्य मशिनबंद झाले आहे. ४ जुनला मतमोजणीनंतर कुणाचे भाग्य उजाळणार आहे हे कळणार आहे. मात्र, मतदान पार पडल्यानंतर चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक गल्ली बोळात, चौका-चौकात, चहा टपरीवर कोण निवडून येणार या चर्चा रंगू लागल्या आहे.

हेही वाचा – राज्यावर वीजसंकटाचे सावट! महानिर्मितीकडे १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये, महिला वर्गात ‘ताई’ आणि ‘भाऊ’ निवडून येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या समर्थकांनी आकडेमोड करीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ कसे निवडून येतात यांचे गणितसुद्धा मांडणे सुरू केले आहे. ‘ताई’ राजुरा विधानसभेत आघाडीवर आहे तर मात्र, ‘भाऊ’ चंद्रपूर, बल्लारपूरात आघाडी घेणार असे समर्थक ठासून सांगत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघात कोण आघाडीवर राहील याची माहिती नातेवाईक, मित्र, कुटुंबातील सदस्य तथा पत्रकारांकडून घेतली जात आहे. वरोरा धानोरकरांना साथ देईल की मुनगंटीवार यांच्या बाजूने उभा राहील असेही बोलले जात आहे. मुख्य रस्ते, बगीच्या, पान टपरी, शासकीय, निमशासकीय कार्यालय, मित्रांच्या ग्रुपपासून तर शाळ, महाविद्यालयात देखील या चर्चा रंगल्या आहेत. सर्वत्र कट्टया्वर राजकीय चर्चां रंगू लागल्या असून ताई व भाऊंचे समर्थक चर्चेत ठोसपणे किल्ला लढविताना दिसत आहेत. बियर बार, हॉटेल तथा इतरत्रही राजकीय चर्चा अग्रस्थानी आहे. त्यामुळे कोण निवडून येणार यावर पैजासुद्धा घेतल्या जात आहेत. एकमेकांना फोनाफानी करून चर्चेचा विषय हा केवळ कोण निवडून येणार हाच आहे.

हेही वाचा – वर्धा : समुद्रालगत बेटांवरील मतदारसंघाची जबाबदारी जिल्ह्यातील ‘या’ नेत्याकडे

काँग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांकडून दावे-प्रतिदावे

‘ताई’ आणि ‘भाऊ’ समर्थकांनी विधानसभा, गावनिहाय, बुथनिहाय आकडेवारी गोळा करण्यास सुरूवात केली आहे. कोणत्या गावात कुणाला किती मतदान झाले यावर खलबत्ते चालू आहे. समर्थकांना फोन करून ‘ताई’ आणि ‘भाऊ’ला किती मतदान झाले यांची आकडेमोड केली जात आहे. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘ताई’च भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. भाजपचे पदाधिकारी ‘भाऊ’च निवडून येण्याचे प्रतिदावे केले जात आहे. सट्टाबाजारात ताई आणि भाऊ यांचा भाव समान असल्याने चर्चेत आणखीच रंगत निर्माण झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur who will win the election between sudhir mungantiwar and pratibha dhanorkar discussion is going on rsj 74 ssb