चंद्रपूर : केंद्रातील भाजपा सरकारने ईडीचा दुरुपयोग करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना त्रास देणे सुरू केले आहे. हेतुपुरस्सर खोट्या गुन्ह्यात अडकवून चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. याचा निषेध म्हणून केंद्रातील भाजपा सरकार तथा ईडीच्या विरोधात चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
गेल्या वर्षीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हेतुपुरस्सर खोट्या गुन्ह्यात ईडीची नोटीस पाठवून त्रास देणे सुरू आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाच नोटीस पाठवली होती. शरद पवार ईडी कार्यालयात हजर होत नाही तोवर नोटीस मागे घेण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली. आता गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना केंद्रातील भाजपा सरकार आणि ईडीने त्रास देत नोटीस पाठवली आहे. जयंत पाटील सातत्याने भाजपा विरोधात जनतेच्या भूमिका मांडत होते. यामुळेच जयंत पाटील यांच्या विरोधात द्वेष भावनेने ईडीची नोटीस पाठवून सोमवार २२ मे रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले.
हेही वाचा – चंद्रपूर : बनावट सोने तारण ठेवून बँकेची ४५ लाखांनी फसवणूक
याचा निषेध म्हणून आज चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ईडी आणि भाजपा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड, युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा व ईडी विरोधात घोषणा देण्यात आल्या. या निषेध आंदोलनावेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, शहर उपाध्यक्ष कुमार पॉल, निसार शेख, राहुल देवतळे, संभाजी खेवले, युवक राष्ट्रवादीचे राहुल वाघ, केतन जोरगेवार, मनोज सोनी, संजय बिस्वास, नदीम शेख, विजय राऊत, अक्षय सगदेव, प्रेमकांत तेमबुरकर, स्वप्नील गेडाम बब्बू भाई इसा, अमित गावंडे, पियुष सहारे, प्रेम परचाके, सुधीर कोयला, तुषार वेट्टी, राहुल भगत, पियुष चांदेकर, शालीक भोयर, राज खोब्रागडे, पंकज मेंढे, तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.