अमरावती : गेल्या नऊ वर्षांच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कामगिरी पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचेही लवकरच मतपरिवर्तन होईल आणि ते खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
बावनमुळे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन भाजपाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनीदेखील नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करून २१ व्या शतकातील समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्येच आहे, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Video: एका हातात छत्री दुसऱ्या हातात एसटी बसचे ‘स्टिअरिंग’!
अनेक राजकीय पक्षातील नेते मोदींच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करीत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचेही मतपरिवर्तन होणार आहे.
इंडिया टुडे आणि सी-व्होटरने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, या सर्वेक्षणात महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी तो खोटा आहे. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी मी बोलू इच्छित नाही. राष्ट्रवादीच्या केवळ ५ जागा आहेत, त्या १८ कशा होतील, त्यांच्याकडे तेवढे उमेदवार आहेत का, हेही माहिती नाही. कुठले सर्वेक्षण ग्राह्य धरायचे, याचाही विचार करावा लागेल. आम्ही जनतेत जाऊन सर्वेक्षण करतो. महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा – ऑगस्टमध्येही पावसाने केला भ्रमनिरास, सात सप्टेंबरनंतर जोर धरणार?
बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कंटाळून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी दूर झाले आहेत. अजूनही ठाकरे गटामध्ये गळती सुरूच आहे. सकाळी नऊ वाजता बोलणारा त्या विमानाचा एक पायलट आहे. त्याने विमान पाडायचे ठरवले आहे. पण, जेव्हा प्रवाशांना कळले, की हे विमान पडणार आहेच, ते विमानातून उतरून गेले, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केली.