नागपूर : राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचा अपमान केला होता आणि आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातला धडा काढून टाकला आहे. एवढेच नाही तर धर्मांतरण बंदी कायदा रद्द केला आहे. काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे असून, कर्नाटकमध्ये झालेला प्रकार मान्य आहे का, याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे नागपूरला आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसच्या धोरणाला पाठिंबा देत उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे. उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाच्या मुद्द्यावर आजच त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – दिव्यांगासाठी खुशखबर! अधिकारीच येणार दारी, काय आहे योजना?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेपासून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असे समीकरण राहिले आहे आणि अजित पवार गेल्या काही दिवसांत सरकारबाबत आरोप करत असले तरी त्यांना योग्यवेळी उत्तर दिले जाईल. दीपक केसरकर यांनी अजित पवारांना जी ऑफर दिली आहे, त्याचे उत्तर अजित पवारांनी दिले पाहिजे. आशिष देशमुख यांनी राहुल गांधींच्या ओबीसीविरोधी भूमिकेबद्दल प्रश्न विचारले, म्हणून नाना पटोलेनी त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. जर ओबीसीबद्दल मत मांडणे काँग्रेसमध्ये चुकीचे असेल आणि पक्षातून काढून टाकले जात असेल तर काँग्रेस ओबीसीविरोधी आहे. आशिष देशमुख यांना कुठलेही पद किंवा उमेदवारी देण्यात येणार नाही. संघटनात्मक काम करण्यासाठी ते पक्षात प्रवेश करत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – भाजपाच्या दोन माजी आमदारांचा ‘केसीआर’च्या ‘बीआरएस’मध्ये प्रवेश
तेलंगणामधील बीआरएसच्या मॉडेलमध्ये किती चुका आहेत, याची एक चित्रफित आम्ही लवकरच सर्वांसमोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. जाहिरातीवरून कुठलेही मतभेद नाही. आम्ही कुठलाही सल्ला दिलेला नाही. तणाव मुळीच नव्हता. कोणीतरी जाहिरात दिली, म्हणून चर्चा सुरू झाली आणि भावना व्यक्त झाल्या. फडणवीस आणि एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते असून त्यांना महाराष्ट्राचे हित कळते. त्यामुळे ते लहानसहान गोष्टीला थारा देणार नाही. अशा जाहिरातींनी कुणाची उंची वाढत नाही आणि कोणाची उंची कमी होत नाही.