नागपूर : काँग्रेस, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे मराठा आणि कुणबी समाजांमध्ये फूट पाडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारचे प्रामाणिक प्रयत्न कायम आहेत. मात्र त्यामुळे काम करणाऱ्या शिंदे सरकारबाबत उगाच कुणी कोल्हेकुई करू नये, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते शनिवारी नागपुरात बोलत होते.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या मुद्द्यावर राज्यातील सरकार गंभीर असून येथील अनेक प्रश्न आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. आता राज्यात ‘ट्रिपल इंजिन’ सरकार आहे. सरकारमधील तीनही नेते विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे किती लक्ष दिले, मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळ कुणाच्या कार्यकाळात बंद झाले, त्यावेळी या दोन्ही प्रदेशांवर होणारा अन्याय कुणाला दिसला नाही का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात विदर्भ व मराठवाड्यावर सर्वाधिक अन्याय झाला आहे. या भागांचा अनुशेष वाढला आहे. सध्या सत्तेवर असलेले सरकार हा अन्याय व अनुशेष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मराठवाड्यासाठी घेण्यात येणारी बैठक कोणत्या ठिकाणी होत आहे, यावर वायफळ चर्चा करण्यापेक्षा त्यातून काय निष्पन्न होते, हे बघणे महत्त्वाचे आहे. विदर्भ व मराठवाड्यातील अनेक समस्या असताना महाविकास आघाडीला सत्तेवर अशी विशेष बैठक घेण्याचे शहाणपण का सुचले नाही, अशी विचारणा आमदार बावनकुळे यांनी केली.
हेही वाचा – मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास फडणवीस का गेले नाहीत? जाणून घ्या…
विरोधकांजवळ आता कोणतेही मुद्दे उरलेलेच नसल्याने ते सामाजिक एकोपा बिघडविण्याचे प्रयत्न करीत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. ‘इंडिया’ आघाडीने प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार किंवा त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार नवीन नाही. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी हाच प्रकार केला होता. त्यांचा हा कित्ता ‘इंडिया’ आघाडीने गिरवला, तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. लोकशाहीत प्रसार माध्यमांवर असे दडपण आणणे म्हणजे शरमेची बाब असल्याचेही बावनकुळे म्हणाले.