गडचिरोली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मी आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई विमानतळावर बैठक झाली. त्यात वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली. वडेट्टीवार तेव्हा मंत्री होते. तरीपण त्यांना भाजप प्रवेशाची घाई होती, असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज पत्रकारपरिषदेत केला. लोकसभा निवडणुकीदरम्यान वडेट्टीवार आणि आत्राम यांच्यात रंगलेला आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा अद्याप सुरूच आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजप- काँग्रेस आमने- सामने आहे. या निवडणुकीत मंत्री धर्मरावबाबा आत्राम व विरोधी पक्षनपेते विजय वडेट्टीवार यांच्यात प्रचारादरम्यान कलगीतुरा रंगला होता. मंत्री धर्मरावबाबा यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे ४ जूननंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा केला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी खुलासा करत हा दावा तथ्यहिन असल्याचे सांगून धर्मरावबाबांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली होती.
हेही वाचा…राजू शेट्टींचे एक पाऊल मागे! बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना पाठिंबा
१४ एप्रिल रेाजी धानोरा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत धर्मरावबाबा आत्राम यांनी १८ एप्रिलला ब्रेकींग देतो, असा इशारा दिला होता. त्यानुसार, १८ रोजी अहेरी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वडेट्टीवार हे मंत्री होते तेव्हा मी आमदार होतो. मुंबईत विमानतळावर टर्मीनल १ वर भेट झाली. यावेळी आम्ही रिझव्हर्ड लॉनमध्ये गेलो. तेथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. यावेळी वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली. यावेळी वडेट्टीवारांनी धर्मरावबाबांचे काय, असे विचारले. त्यावर बावनकुळे यांनी त्यांच्याबद्दल काही नाही, असे सांगितले होते, असा चर्चेचा तपशील होता, असे धर्मरावबाबांनी सांगितले.या बैठकीला आमच्या तिघांचेही स्वीय सहायक होते. ही बाब शंभर टक्के खरी असून नार्को टेस्ट करायची तर माझी व विरोधी पक्षनेत्याचीही करा, असे आव्हान त्यांनी दिले.
माझ्याशी पंगा घेतलाय, आता जशास तसे उत्तर : वडेट्टीवार
आत्राम यांच्या आरोपांना विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले. धर्मरावबाबा खूप काही गौप्यस्फोट करतील असे वाटले, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. विमानतळावर पक्षप्रवेशाच्या बैठका होतात का, असा प्रतिसवाल करुन वडेट्टीवार यांनी धर्मरावबाबांचा दावा खोडून काढला. माझ्याशी पंगा घेतलाय तर जशास तसे उत्तर मिळेल. माझ्या भानगडीत पडू नका, नाही तर मी वैयक्तिक खुलासे करेन आणि त्यानंतर त्यांना मतदारसंघात फिरणे कठीण होईल, असा इशारा त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिला.
हेही वाचा…राजू शेट्टींचे एक पाऊल मागे! बुलढाण्यात रविकांत तुपकर यांना पाठिंबा
नेमका वाद काय ?
मंत्री धर्मरावबाबा आत्राम व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप- प्रत्यारोप निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. धर्मरावबाबा हे केवळ पैशाने श्रीमंत आहेत, पण बुध्दीने नाही, असे सांगताना वडेट्टीवार यांची जीभ घसरली होती. एकेरी उल्लेख करत डिवचल्याने हा वार धर्मराबाबांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर धर्मरावबाबांनीही आपल्या शैलीत वडेट्टीवार यांचा खरपूस समाचार घेत खोचक टीका केली होती. याच दरम्यान धर्मरावबाबांनी ४ जूननंतर वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा केला होता. त्यामुळे दोघांतील वाक् युध्द शिगेला पोहोचले आहे.