विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार व माजी आमदार नागो गाणार यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतल्याचे संकेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिले.
या निवडणुकीच्या संदर्भात शुक्रवारी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली धंतोलीतील भाजपच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीला शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व भाजपचे पूर्व विदर्भातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागो गाणार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. भाजपा या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. गाणार यांनी भाजपशी सल्लामसलत न करताच शिक्षक परिषदेतर्फे यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपा वेगळी भूमिका घेणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती.
हेही वाचा- कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताचे प्रयत्न; माजी संचालक डॉ. शेखर मांडे यांचे प्रतिपादन
मधल्या काळात भाजपकडूनही काही नावे चर्चेत होती. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या भाजपच्या बैठकीकडे शिक्षक परिषदेसह भाजप शिक्षक आघाडीच्या नेत्यांचेही लक्ष लागले होते. बैठकीत बावनकुळे यांनी सर्वसंबंधितांशी चर्चा करून याही वेळी गाणार यांनाच पाठिंबा देण्याचे संकेत दिले. दरम्यान मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती व त्यातच गाणार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता. शनिवारी शिक्षक परिषदेची बैठक होणार असून त्यात गाणार यांचे नाव जाहीर केले जाणार असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.