नागपूर : महाविकास आघाडीचा जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणा असून त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मुळातच काँग्रेसचे रक्त हे विकास करण्याचे नाही तर केवळ घोषणा करण्याचे आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसने आजपर्यंत निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेली एकही गोष्ट पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांचा जाहीरनामा म्हणजे केवळ घोषणा असल्याची टीका त्यांनी केली.
खरगे संघ मुख्यालयात गेले का ?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे मतांसाठी काहीही बोलतात, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही. संघात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसल्याचे ते म्हणाले, मात्र ते कधी संघ मुख्यालयात जाऊन आले का ? त्यांच्याकडे दुर्बिण आहे का. खर्गेंनी एकदा तरी संघ कार्यालयात येऊन बघावं तिथे काय काय आहे. संघावर टीका करण्यापेक्षा खरगे यांनी संघ काय जाणून घेतले तर त्यांना संघ कळेल, असेही बावनकुळे म्हणाले. हरियाणामध्ये काय झाले हे देशाने बघितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात असली तरी ते विश्व गौरव पुरुष असल्याचे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – “काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
राज्य सरकारने महिलासह युवक व शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्यानंतर त्याचा लाभ मिळतो आहे, मात्र आता केवळ मताच्या भीतीपोटी काँग्रेसने पुन्हा हा खोटारडेपणा सुरू केला, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
महाडिक यांचे वक्तव्य चुकीचे
भाजपचे खासदार महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी भावनेच्या भरात किंवा उत्साहात असे वक्तव्य करू नये अशी सूचना त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार म्हणून आघाडीने घोषणा केली असली तरी त्याचा खोटारडेपणा लोकसभेच्यावेळी समोर आला आहे. योजना बंद करावी म्हणून ते न्यायालयात गेले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
जरांगे यांची मागणी सामाजिक
मनोज जरांगेबाबत बोलणे योग्य नाही. त्यांची सामाजिक मागणी आहे. जेव्हा जेव्हा सरकार येईल तेव्हा त्यांचे प्रश्न पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची राहणार आहे असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – ‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
शरद पवार यांच्या बद्दल..
शरद पवार यांचा राजकीय क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांनी सरकार बदलणार असल्याचे सांगितले असेल तर ते निवडणुकीनंतर कळेल. मात्र त्यांच्याबद्दल टिप्पणी करणे योग्य नाही. महाराष्ट्राची जनता आता महायुतीच्या बाजूने असल्याचे बावनकुळे म्हणाले.