अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी १४ फेब्रुवारीला सरकार कोसळण्याचे केलेले वक्तव्य तथ्यहीन व हास्यास्पद आहे. उलट राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला आणखी सुमारे २० आमदारांचा पाठिंबा वाढेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ते अकोल्यात आले असता माध्यमांशी बोलत होते. आम्ही दोन वेळा विधानसभेत १६४ चा आकडा पार केला. एकदा विश्वास प्रस्तावावेळी तर काँग्रेसचे १० आमदार गैरहजर होते. पुन्हा विश्वासमताची वेळ आल्यास शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांची संख्या १८४ पर्यंत पोहोचेल, असा दावा बावनकुळे यांनी केला.
महाविकास आघाडीतील ५० आमदार केव्हा गेले, हे कळले देखील नाही. आता १० आमदार केव्हा जातील, हेही समजणार नाही. महाविकास आघाडीतील आमदारांना हुकूमशाही पद्धतीने वागणूक देण्यात येते. सकाळी उठून सुरू होणारा भोंगा कुणालाच आवडत नाही, असा टोला बावनकुळेंनी नाव न घेता खासदार संजय राऊतांना लगावला.
महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार देखील नसतील. यापूर्वीच्या ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांचा पेनही चालत नव्हता, अशी टीका बावनकुळे यांनी करून विरोधकांनी विरोधी पक्ष म्हणून योग्य पद्धतीने काम करावे, असा सल्ला देखील दिला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, उमेदवार डॉ. रणजीत पाटील, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे आदी उपस्थित होते.
चौकट
पंकजा मुंडेंविरोधात षडयंत्र
पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. मात्र, त्यांच्याविरोधात विरोधक षडयंत्र रचत असून, चुकीच्या बाबी पसरविण्यात येत आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला.