लोकसत्ता टीम

अकोला : महाविकास आघाडी सरकाने अडीच वर्ष यंत्रणेचा गैरवापरच केला. त्यामुळे त्यांना आताही तेच वाटते. मात्र, महायुती सरकार सुडभावनेने वागणार नसून आकासापोटी कारवाई करणार नाही. नियमानुसारच ते कारवाई करतील. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रक्तातच आकसवृत्ती नाही. आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवावा, कारण ते तुमच्यासारखे आकसाने वागणारे नाहीत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाना साधला.

बावनकुळे यांनी दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सरकारमध्ये पक्षाची भूमिका काय? हे सर्वश्रुत होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना दिलेले पत्र जाहीर केले. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक मविआ सरकारमध्ये मंत्री असताना राजीनामा मागितला होता. आताही महायुतीमध्ये त्यांना पसंती नसून त्यांना व्यक्तिगत विरोध नाही. न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले तर काही समस्या नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.

आणखी वाचा-संग्रामपुर बाजार समिती सभापतीची निवड बिनविरोध; सभापती सेनेचा, उपसभापती काँग्रेसचा

मनोज जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी फडणवीसांनी १३ ते १४ रात्र जागून कायदा तयार केला. त्यामध्ये कायद्याचे सर्व अधिकारी, वेगवेगळे आयोग, उपसमिती, सर्वपक्षीय मराठा समाजाचे नेते यांना सोबत घेऊन फडणवीसांनी कार्य केले. आरक्षण मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी खूप काम केले. स्वातंत्र्यांनंतर आतापर्यंत असे कार्य कुणीही केले नाही. त्यामुळे जरांगेंच्या वक्तव्यावर राज्यात कुणीही विश्वास ठेवणार नाही.

‘भाजप उद्धव सेना नाही’

मुख्यमंत्र्यांचा चेहरा न देता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन राज्यांमध्ये पूर्ण बहुमत मिळवले. जनता, आमदारांची मते जाणून घेतल्यावर नेतृत्व ठरवले जाईल. देशात लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. भाजप काही उद्धव सेना नाही, कुणालाही उचलले आणि कुठेही बसवले, अशी टीकादेखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पक्षाचे निरीक्षक संबंधित राज्यात गेले असून लवकरच सक्षम सरकार अस्तित्वात येईल. राज्यातील एकनाथ शिंदे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader