नागपूर : ललित पाटीलमुळे गाजत असलेल्या ड्रग प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा पदाधिकारी अडकला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे किती खोल आहेत याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारजवळ आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील काही नेते या प्रकरणात अडकले असून लवकरच सत्य समोर येईल, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
बावनकुळे शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते. ड्रगचे जाळे कोणी पसरवले आणि त्यात कोण सहभागी आहे, ललित पाटील हा कोणाचा कार्यकर्ता आहे हे सर्व समोर येईल मात्र त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. संजय राऊत बीनबुडाचे आरोप करत असतात त्यामुळे त्यांना फार महत्त्व देत नाही. दाऊद कुणाचा हस्तक होता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. उद्धव ठाकरे ज्यांच्यासोबत बसले होते त्यांनाच विचारा की दाऊद कोणाचा हस्तक होता. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समाजात तेढ निर्माण करत आहेत. तरुण, आदिवासी, धनगर यांच्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण करत आहेत. ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – भाजपाने शिंदे, अजित पवारांना नाक घासून…; नाना पटोले स्पष्टच बोलले
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विरोधी पक्षाचे लोक असतात आणि त्यांच्या संमतीनेच कामकाज ठरते. आता समितीने दहा दिवसांचे काम ठरवले आहे. मात्र अधिवेशन सुरू असताना पुन्हा बैठक होईल आणि तेव्हा गरज वाटली तर काम वाढवता येईल. काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रकाश आंबेडकर यांना विजयी होऊ दिले नाही. काँग्रेसच प्रकाश आंबेडकरांना आघाडीत येऊ देत नसल्याचे बावनकुळे म्हणाले.