नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेत आहेत. इतक्या खालच्या पातळीवर ते गेले आहेत. महाराष्ट्रात हा अशोभनीय प्रकार त्यांनी केला. काँग्रेसने देशात पुन्हा एकदा इंग्रजांचा काळ आणला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात बोलत होते.

इंग्रजांच्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. पटोले यांनी पदाचा अपमान केला आहे. त्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. या पद्धतीची कृती त्यांना शोभणारी नाही. भविष्यात त्यांची जी वृत्ती आहे, जो बुद्धीभेद झाला आहे, ती त्यांनी दुरुस्त केली पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आपण २१ व्या शतकात आहोत, यातून काय संदेश समाजाला जात आहे, हे बघितले पाहिजे. पाय धुणारा असो की धुवून घेणारा असो, हे योग्य नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – एक काय, दहावेळा पाय धुणार! विजय गुरव यांची सडेतोड भूमिका, म्हणाले, “पटोले माझे दैवत, विरोधकांनी राजकारण…”

पुढील पाच वर्षांसाठी नियोजन

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पॉईंट ०.३ टक्के कमी मते मिळाली. जिथे आम्ही कमी पडलो तिथे अधिकचे काम करणार आहोत. कमी पडू नये यासाठी नियोजन केले आहे. यावर आम्ही सर्व नेते काम करू. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रात यात्रा काढली जाणार आहे. ज्यांनी मत दिले आणि ज्यांनी नाही दिले, त्यांचेही आभार मानले जाईल. पुढील पाच वर्षांसाठी योजना तयार केली जात आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मोदी बोलले तर तुम्हाला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले की महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. खालच्या भाषेत टीका केली जाते. वैयक्तिक स्वरुपाची टीकाटिपणी होते. शरद पवार यांनी याचे आकलन केले पाहिजे. एखादा शब्द पंतप्रधान मोदी बोलले तर तुम्हाला तो एवढा का लागतो, असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहूनच…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी, अशी विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केली आहे. केंद्रीय नेतृत्वानेसुद्धा आमची विनंती मान्य केली, असे आम्ही समजतो. महायुती सरकार लोकांसाठी काम करीत आहे, यासाठी छगन भुजबळ यांचे सरकारमध्ये असणे आवश्यक आहे. माहायुतीच्या सर्वच नेत्यांनी चांगले काम करायचे आहे. छगन भुजबळ यांची नाराजी नाही, पण असेल तर त्यांनाच विचारावे लागेल. त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणे योग्य नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. ही भूमिका आमची आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – नागपूर : गरोदर महिलांच्या तपासणीत १० हजारांवर सिकलसेल वाहकांची नोंद

एकनाथ खडसेंबाबत काय म्हणाले बावनकुळे?

एकनाथ खडसे यांच्यावर सध्या तरी पक्षाची कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. ते अजूनही भाजपात नाही. जेव्हा भाजपात येतील, तेव्हा पाहू. मात्र त्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महाराष्ट्राचे प्रभारी अश्विनी वैष्णव येतील तेव्हा त्याबद्दल चर्चा होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत पाच मुख्यमंत्री

महाविकास आघाडीत पाच मुख्यमंत्री झाले आहेत. ६ लोकांचे बॅनर लागले, कोण मुख्यमंत्री बनणार आहे, यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. आमचे मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे आहे. येणाऱ्या दिवसात महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल, यावर सध्या कुठलीही चर्चा नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे नेते आहेत. आज मुख्यमंत्रीपदाची चर्चा करण्याची गरज नाही. तीनही पक्षाचे नेते मिळून मुख्यमंत्री ठरवतील. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून ठरले नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.