नागपूर : विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते आता ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हती का असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचा खोटारडेपणा समोर आल्यामुळे जनतेने महायुतीला मतदान केले आहे. ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त करणे म्हणजे हा मतदारांचा अपमान आहे. आघाडीच्या नेत्यांना सध्या झोप लागत नाही. झोप लागेल तेव्हा ते शांत होतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा पराभवानंतर शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी खरे तर आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मात्र आता ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडून ते आपले अपयश लपवत आहे. देशात व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुती चांगले काम करत आहे आणि करणार आहे हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेने आम्हाला कौल दिला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीचे ३३ खासदार निवडून आले त्यावेळी ईव्हीएम चांगली होती का ? असा प्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा – चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेत भाजपाचे मताधिक्य वाढले; चार उमेदवारांना लाखांवर मते

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा खासदार विजयी झाला आहे. आम्हाला दीड हजार मते कमी पडली. त्या ठिकाणी ईव्हीएमचा घोळ झाला असेल तर ते निवडून कसे आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पराभवातून काही गोष्टी शिकल्या पाहिजे. त्यावर आत्मचिंतन केले पाहिजे, मात्र त्यांची मानसिकता नाही. त्यांना पराभव पचवता येत नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? धर्मरावबाबा आत्राम आणि डॉ. मिलिंद नरोटे यांची नवे चर्चेत…

प्रत्येक पक्षाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा तशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या समर्थकांची इच्छा की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे मात्र याबाबतचा निर्णय महायुतीमधील सर्व नेते केंद्रीय नेतृत्वासोबत एकत्र बसून घेतील. केवळ मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीचा हा शपथविधी सोहळा नाही तर अन्य मंत्री, त्यांचे विभाग, पालकमंत्री आणि पाच वर्षासाठी पूर्ण कार्यक्रम ठरविला जातो त्यामुळे वेळ लागतो, मात्र, लवकरच मुख्यमंत्री आणि अन्य मंत्रीमंडळाची नावे निश्चित केली जाईल. शपथविधी सोहळा लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.