अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नाशिक, धाराशीव, परभणी येथील खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले. उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व पायदळी तुडवले. ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावे लागेल, त्या दिवशी मी माझे शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. पण, उद्धव ठाकरेंनी स्वत: बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. मतांच्या लांगुनचालनासाठी उद्धव ठाकरेंनी धर्म सोडला, हिंदुत्वाचा विचार सोडला. भगव्या ध्वजाचा विचार सोडला. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत, पुढच्या काळात ते अध्यक्षही होतील, अशी टीका महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

बावनकुळे म्हणाले, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने ऐकणे सोडले आहे. मला त्यांचे बोलणे ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलून काहीच फायदा नाही. दिशा सालियन प्रकरणाचा अंतिम अहवाल येऊ द्यावा, आज या विषयावर मत प्रदर्शित करणे हे घाईचे होईल, असे मला वाटते. दिशा सालियनच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, ते उच्च न्यायालयात गेले आहेत. जोपर्यंत पोलीस अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचत नाही, तोवर माझ्या सारख्या व्यक्तीने बोलून तपासात यंत्रणेत अडथळा आणणे योग्य होणार नाही.

नितेश राणे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे यांनी राणे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. बावनकुळे म्हणाले, नितेश राणे यांनी त्यांच्या वक्तव्याविषयी याआधीच स्पष्टीकरण दिले आहे. नितेश राणे यांच्यासोबत माझे वैयक्तिक बोलणे झाले आहे. या देशामध्ये राहणारा मुस्लीम समाज, जो या देशाचे भले करण्याचा विचार करतो, त्यांच्याबद्दल नितेश राणे यांचे काहीही म्हणणे नाही. पण, या देशामध्ये अनेक ठिकाणी दुर्देवी अशा घटना घडतात. पाकिस्तानचा संघ जिंकला की फटाके फोडले जातात. अनेक ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकवले जातात. आपल्या देशातील सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेतात, पण पाकिस्तानचे गुण गातात, असे काही लोक आहेत. देशविरोधी, महाराष्ट्रविरोधी षडयंत्र रचण्याची काही ठिकाणे तयार झाली आहेत. त्या विषयाबद्दल नितेश राणे बोलले आहेत. जे भारतात राहून पाकिस्तानचे गुण गातात, त्यांच्यावर राणे यांचा आक्षेप आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.