नागपूर : नागपूर शहरात पोलीस ठाण्याचे संख्या वाढलीतरी गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. खूनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असल्याचे दिसून आले आहे. शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यातील बरेच सीसीटीटीव्ही बंद पडलेले आहेत.शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. यातील बंद व नादुरुस्त कॅमेरे पुन्हा संचालित करुन  शहरातील रस्ते, गल्लोगल्ली तसेच सर्व भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आणा, असे निर्देश नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिले.

नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील विविध विषयांच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी  जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका उपायुक्त विनोद जाधव यांच्यासह पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ई-गव्हर्नन्स महाव्यवस्थापक डॉ. शील घुले यांनी विस्तृत माहिती सादर केली.

यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरांच्या स्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी माहिती दिली. शहरात सुरक्षेच्या दृष्टीने एकूण ३६०० सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. यापैकी काहींमध्ये बिघाड आल्यामुळे बंदावस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शहरात निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरांची मोठी मदत होते. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरांची यंत्रणा अधिक अद्ययावत करण्याची गरज असून यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. नव्याने शहरातील सर्व भागात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतील. जास्तीत जास्त भाग कव्हर व्हावा यादृष्टीने ठिकाणे निवडण्यात यावेत. आवश्यकता भासल्यास खासगी जागेमध्ये देखील कॅमेरांचे खांब लावण्यात यावे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही निर्देश पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

शहरातील नादुरुस्त कॅमेरांच्या संदर्भात राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांना पत्र देण्यात येईल. यासोबतच ‘महाआयटी’च्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही  बावनकुळे यांनी सांगितले. त्यांनी शहरातील नागरिकांच्या घरामधील सीसीटीव्हीची कनेक्टिव्हिटी पोलीस यंत्रणेकडे घेण्याबाबत पडताळणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.