नागपूर : घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. आतापर्यंत त्यांच्याजवळचे इतके लोक सोडून गेले. त्यावेळी ते काही करू शकले नाही आणि येथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही आणि ती क्षमता त्यांच्याकडे नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा >>> बुलढाणा : निरक्षरांचे सर्वेक्षण सुरू, साडेपाच हजार सर्वेक्षक नियुक्त; निरक्षरांना ऑन व ऑफलाईन शिक्षण देण्याचे नियोजन
बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्याचा दरारा आणि त्यांच्या कामाचे आम्ही तीस वर्षाचे साक्षी आहे. पक्ष चालविण्यासाठी २४ तासातले अठरा तास काम करावे लागत असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे ती क्षमता नाही. २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे चार ते पाच लोक दिसतील असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेस पक्षाचा इतिहास होता आणि तो आता आता नाही. काँग्रेसला आता भविष्य नाही त्यामुळे ते इतिहासातील काहीतरी काढून पक्ष टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे जहाज डुबत आहे. त्यात कोणी बसणार नाही. त्यामुळे इस्रो नेहरूंनी तयार केला असे ते सांगतात. चंद्रायान तीन तयार करण्यासाठी मात्र मोदींना यावे लागले असेही बावनकुळे म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायद्याचे तज्ज्ञ आहेत, त्यामुळे अपात्र आमदारांबाबत ते योग्य निर्णय घेतील असेही बावनकुळे म्हणाले.