राहुल गांधी सातत्याने सावरकरांचा अपमान करत आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते मनी शंकर अय्यर यांच्या फोटोला बाळासाहेबांनी चपल मारली होती. आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याची हिंमत करणार का, असा सवाल उपस्थित करत त्यांची महाविकास आघाडीतून फारकत घेण्याची हिंमत नसून ते केवळ नौटंकीबाज आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेसकडून वारंवार अपमान होत असताना तो सहन केला जाणार नाही अशी केवळ भाषा करायची. मात्र प्रत्यक्षात कृती करायची नाही.
हेही वाचा >>>आंदोलनांना दांडी माराल तर थेट निलंबन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना निर्देश
बाळासाहेब ठाकरे यांनी जी हिंमत दाखविली होती ती त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मुलामध्ये नाही. काँग्रेसशी फारकत घेण्याबाबत मंगळवार सकाळपर्यंत त्यांना वेळ दिली होती. त्यांनी फारकत घेण्याचे जाहीर केले असते तर त्यांचे स्वागत करण्यासाठी मी स्वत: गेलो असतो. मुख्यमंत्री पद आणि मुलाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत होते आणि आता त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहे. संजय राऊत कारागृहातून परत आल्यावर त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे. ते वेडे झाले असून त्यांच्यासाठी रुग्णालयाचा शोध घेऊन तिथे ठेवले पाहिजे. सावरकर ५० वर्ष कारागृहात होते आणि त्यांनी अनेक यातना सहन केल्या आहेत. राहुल गांधी यांनी एक दिवस कारागृहात राहून दाखवावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता मध्यस्थी करु लागले आहेत. त्यांनी सुद्धा ही नौंटकी बंद केली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.