राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा केला होता. तसेच यासंदर्भातील एक व्हिडीओ दाखवत हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आज महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यात आलं आहे. दरम्यान, याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
अनेक गोष्टी सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. पण राज ठाकरे यांनी काल माहीममधील बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आणि शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. त्यासाठी मी दोघांचेही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सरकारकडून यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं बांधकाम पाडण्यात आलं होतं. आज माहीममध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या पद्धतीने राज्यात जिथेही अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढले पाहिजे. शिवाय समाजात कुठेही वैर निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो दोघेही संवेदनशील नेते आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी माहीममधील बांधकामासंदर्भात केलेलं विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारं आहे, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे, यासंदर्भातही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होईल, असं वाटत नाही. याउलट त्यांनी त्यांच्या भाषणात जावेद अख्तर यांचं कौतुक केलं. तसेच भारताचं संविधान मानणारा मुस्लीम आम्हाला हवा आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही, असे ते म्हणाले.