नागपूर : सुमारे १४० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असूनही प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या कक्षेत घेण्याची किमया आपल्या भारतीय राज्यघटनेने साध्य करुन दाखविली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या आपल्या राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील १० लाख घरात शासन पोहचविणार आहे. यातून लोकशाहीचे मूलतत्त्व व कर्तव्यतत्पर नागरिकत्वाचा पाया भक्कम होईल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह अंतर्गत घर घर संविधान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, बी वैष्णवी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जागतिक पातळीवर भारताने साध्य केलेले यश हे आपल्या संवैधानिक मूल्यांवर साध्य केले आहे. अनेक देशांकडून भारतीय संविधानाचा अभ्यास केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाशी प्रत्येकाने कटिबध्द होण्याचे आवाहन करुन विकसीत भारताचा संकल्प जाहीर केला आहे. संविधानातील मूल्यांवर आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत सर्वोत्तम राज्य करु असा निर्धार मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या कर्तव्यतत्पर भूमिकेतून भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या भारतीय राज्यघटनेची उद्देशिका घराघरात पोहचविण्याचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातून व या दीक्षाभूमीतून होत असल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले.

सामाजिक न्याय विभागामार्फत राबबिल्या जाणाऱ्या या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी स्वयंस्फूर्त पूढे येऊन सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा दिलेला बहुमोल संदेश हा अत्यंत प्रभावी ठरला आहे. त्यांच्या या संदेशातून कोट्यावधी लोकांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात अमुलाग्र बदल साध्य केला आहे. त्यांनी दिलेले लोकशाहीचे मूल्य अधिक मोलाचे असून समाजही आता जागृत झाल्याचे राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले.

खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आपल्या मनोगतात महामानवाला अभिवादन करुन नागपूर येथील सर्व शासकीय कार्यालये जयंतीच्या दिवशी विशेष रोषणाईने उजळविल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आहे. यात रमाई आवास घरकुल, स्वाधार योजना, तृतीय पंथीयांना ओळखपत्र वाटप, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे समाजासाठी व युवकांसाठी सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. संविधानाची उद्देशिका युवकांनी मुखोद्गत करुन त्यातील सार आपल्या जीवनात, वर्तणूकीत आणला पाहिजे. महाराष्ट्रातील जी काही महत्वाची ठिकाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत आहेत ती स्थळे नव्या पिढीला शक्तीस्थळासारखी आहेत. या स्थळांचे जतन शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पालकमत्री बावनकुळे यांनी सांगितले.

महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते मान्यवरांना संविधान उद्देशिकेची फ्रेम देण्यात आली.