नागपूर : राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला असून, १ मे २०२५ पासून ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे जाहीर केले.
“आता नागपूरमध्ये घर घेत असाल, तरी पुण्याहूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आधार कार्ड आणि इनकम टॅक्स प्रमाणपत्राच्या आधारे तुमचा चेहरा नोंदणीसाठी वापरण्याची सुविधा मिळणार आहे.” असे बावनकुळे यांनी सांगितले. या निर्णयामुळे भ्रष्टाचार कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील. “डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा संकल्प आहे, आणि आम्ही त्यावर काम करत आहोत,” असेही बावनकुळे म्हणाले.
अधिक सोपे आणि पारदर्शक होणार
नवीन महसूल प्रणालीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यात घर खरेदी-विक्री, जमीन व्यवहार आणि नोंदणी अधिक सुटसुटीत आणि सुलभ होणार आहे. सध्या मालमत्ता खरेदी किवा विक्रीसाठी संबधित गावात, शहरात, तालुक्याच्या ठिकाणी रजिस्ट्री करण्यासाठी जावे लागते. वेळ आणि पैसे खर्च होतात. सरकारच्या नवीन निर्णयामुळे त्याची बचत होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्यामुळे सर्व सामान्यांची सोय झाली. अनेक योजना ऑनलाईन केल्या. विद्यार्थ्यांना सहजपणे जात व इतर प्रमाणपत्र देण्याची सोय केली.