लोकसत्ता टीम

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर भ्याड हल्ल्याची घटना मनाला सुन्न करणारी आहे. मात्र, या घटनेचे काही लोक राजकारण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांनी सरकारच्या पाठीमागे आणि या हल्ल्यात ज्यांचे जीव गेले त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमाशी बोलत होते. या घटनेचे राजकारण करण्याची गरज नाही. संपूर्ण देशाने सरकारच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे हात मजबूत केले पाहिजे. पण काही लोक राजकारण करत आहे. पहलगामच्या घटनेनंतर येथे झालेल्या हल्ल्याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. मृतकामध्ये सहा लोक महाराष्ट्रातील आहे.

अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील पर्यटकाशी मी सुद्धा संपर्कात आहे. सरकारने त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी व्यवस्था करत आहे. तेथील पर्यटकांना धर्म विचारून हिंदुना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. अशा पद्धतीची घटना दुर्दैवी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व या हल्ल्यातील मृतक आणि जखमी झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे. या घटनेमध्ये संपूर्ण देश पाठीशी उभा करून एकसंघपणे सरकारच्या मागे उभे राहून मजबूत केले पाहिजे.

अमरावती नागपूर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांशी संपर्क साधला आहे. तातडीने काय व्यवस्था करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सर्वच स्तरावरून यासाठी प्रयत्न सुरू आहे. जम्मू काश्मीर येथे पर्यटकांची संख्या वाढत होती. कलम ३७० कलम हटवल्यानंतर तेथील वातावरण ज्या पद्धतीचा बदलत गेले आहे त्याला दहशतवाद्यांकडून गालबोट लावण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकार अजून चांगले आणि शांत काश्मीर करण्याचा प्रयत्न करणार आहे असेही बावनकुळे म्हणाले.