लोकसत्ता टीम
अकोला : शरद पवार ४० वर्ष सत्तेत राहिले आहेत. मात्र, कधीही मराठा समाजाला आरक्षण, सवलती मिळायला हव्यात, यासाठी त्यांनी भूमिका घेतली नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून मुख्यमंत्री असताना त्यासाठी पुढाकार घेतला. नतद्रष्ट उद्धव ठाकरे सरकारला ते न्यायालयात टिकवता आले नाही. मग आता शरद पवारांना बोलण्याचा अधिकार तरी आहे का? अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचीच भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
जनसंवाद यात्रेनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जालना जिल्ह्यातील घटनेवरून शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. त्यावर आ.बावनकुळेंनी पलटवार केला. ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे देखील शरद पवार अनेक वेळा बोलले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची खरी गरज आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्वत: आरक्षणासाठी समिती तयार करून आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात देखील टिकले. उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यावर सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली गेली नाही. त्यावेळी शरद पवारच सरकारचे सर्वेसर्वा होते. शरद पवारांनी त्यांचे लाडके तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून योग्य वकिलांची फौज लावत आरक्षण का टिकवले नाही. ही जबाबादारी त्यांची नव्हती का? असे सवाल आ.बावनकुळे यांनी केले.
आणखी वाचा-जालना मराठा आंदोलक लाठीमार प्रकरण, चौकशीअंती जिल्हा पोलीस अधीक्षकांवर मोठी कारवाई
नागपूरमध्ये गोवारी शहीद झाले होते. ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या चुकीमुळे झाले होते. शरद पवारांनी त्यावेळी निवेदन देखील स्वीकारले नव्हते, अनेक जण जखमी झाले होते, त्यांच्या भेटीला सुद्धा ते गेले नाहीत. त्यामुळे आता अष्टपैलू व कर्तव्यदक्ष देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा अधिकार शरद पवारांना आहे तरी का? अशी टीका बावनकुळेंनी केली. देवेंद्र फडणवीस कधीही लाठीमार करण्याचा आदेश देऊच शकत नाहीत. उलट लाठीमार करू नका, हेच त्यांचे म्हणणे असते. जालना जिल्ह्यातील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आ.बावनकुळे यांनी केली.
ताफा अडवण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवले
मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आला. यावेळी त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आले. आदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.