लोकसत्ता टीम

नागपूर : जाहीरपणे कोणी महायुतीच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून वक्तव्य किंवा बंड पुकारले जात असेल अशा नेत्याला किंवा कार्यकर्त्याला पक्षात स्थान राहणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाच्या अंतर्गत विषयाला माध्यमांसमोर आणि सार्वजनिक बैठकांमध्ये पक्षाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने पक्षाच्या नियमांचा उल्लंघन करण्याचे काम भाजपाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महायुतीच्या ध्येय धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे. पुढच्या काळात ज्या ज्या विधानसभा मतदार संघात महायुतीच्या विरुद्ध पक्षातील जो नेता आणि कार्यकर्ता जाहीरपणे वक्तव्य किंवा बंड पुकारेल, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. पक्षाच्या व्यासपीठावर प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे त्यामुळे जाहीरपणे वक्तव्य करणे टाळावे असा इशारा त्यांनी दिला.

आणखी वाचा-आदर्श आचारसंहिता : पहिले २४, ४८ व ७२ तास महत्त्वाचे कारण…

लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात घेण्यात आली तर निवडणूक आयोगावर टीका केली, आता विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घेतली जात आहे तरी ते टीका करतात. महाविकास आघाडी सध्या पराभवाच्या मानसिकतेत असून ते दररोज सरड्यासारखे रंग बदलत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. निवडणुकीची घोषणा होतात महाविकास आघाडी आता पराभवाच्या मानसिकतेमध्ये असल्यामुळे वेगवेगळे आरोप करत असतात. निवडणूक आयोगावर ते प्रश्नचिन्ह उभे करत त्यांच्यावर आरोप करत आहे. त्यांचा पराभव हा निश्चित आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप करतील असेही बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-राज्यात आरक्षण उपवर्गीकरण होणार, अभ्यासासाठी सरकारकडून समिती

निवडणुकीची घोषणा करण्यात आली असली तरी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून कामाला लागलो आहे. आमची तयारी सुरू झाली असून जनतेपर्यंत पोहचतो आहे. बुथ पातळीवर आमचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी महायुतीचे जास्त आमदार निवडून येतील अशी तयारी आम्ही केली आहे. डबल इंजिन सरकार ही महाराष्ट्राची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही मत जनतेकडे मत मागणार आहे. आमच्याकडे विकास कामांची जी शिदोरी आहे ती जनतेसमोर मांडणार आहे. लाडली लक्ष्मी योजनेवर महाविकास आघाडीचे नेते जेवढे टीका करतील तेवढा फायदा आम्हाला होणार आहे. उद्या बुधवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, त्यात भाजपकडे ज्या जागा आहेत त्यावर चर्चा केली जाईल असेही बावनकुळे म्हणाले.