लोकसत्ता टीम

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२५ साठी अर्ज करण्याच्या तारखेत बदल केला आहे. १८ फेब्रुवारी ही यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आता अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता उमदेवार २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. तसेच आता उमेदवार त्यांच्या ओटीआरमध्ये म्हणजेच वन टाइम रजिस्ट्रेशन प्रोफाइलमध्ये बदल करू शकतात. त्याच वेळी, आयोगाने यूपीएससी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.

यूपीएससीने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. यूपीएससीकडून पूर्व परीक्षेसाठी दुसऱ्यांदा अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. आयोगाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी उमेदवार २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्यांची कागदपत्रे अपलोड करू शकतात. अर्ज केल्यानंतर, उमेदवार २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा देखील करू शकतात. यूपीएससीने प्रथमच क्युटीआर प्रोफाइलमध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोटीस जारी करताना आयोगाने म्हटले आहे की, अर्ज करताना तांत्रिक त्रुटींच्या तक्रारी आल्यानंतर आयोगाने यंदाच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये काही बदल केले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवार एकवेळच्या नोंदणीमध्ये काही गोष्टी बदलू शकतात, असे सांगण्यात आले आहे.

Story img Loader